भंडारा : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत १२ घटकपक्ष असलेल्या महायुतीने १४ जानेवारी रोजी राज्यात एकाच दिवशी जिल्हास्तरीय महामेळाव्याचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातही रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हेमंत सेलिब्रेशनमध्ये जिल्हास्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या समन्वय महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत महायुतीच्या नेत्यांमध्ये असमन्वय असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी येथील व्ही.के. हॉटेल येथे पत्रपरिषद घेतली. यावेळी जिल्हास्तरीय मेळाव्यातून कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधू पाहणाऱ्या जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्येच असमन्वय प्रकर्षाने जाणवले. पत्रपरिषदेला शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर अनुपस्थित होते, तर महायुतीच्या ‘बॅनर’वर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते प्रफुल पटेल यांचे छायाचित्र नव्हते. या बाबी सर्वांनाच खटकणाऱ्या ठरल्या. पत्रपरिषदेच्या वेळेत दोन ते तीन वेळा बदल केल्यानंतरही नियोजित वेळेत पत्रकार परिषद सुरू झाली नाही. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींनी रोष व्यक्त केला. पत्रपरिषदेला उशिरा सुरुवात झाली खरी मात्र, शिवसेनेचे आमदार किंवा जिल्हाध्यक्ष यापैकी कुणीही उपस्थित नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ते थोड्याच वेळात येतील, असे सांगून भाजप खासदार सुनील मेंढे यांनी वेळ मारून नेली. मात्र पत्रपरिषद संपली तरीही शिवसेनेतील एकही पदाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या समन्वय समितीतच समन्वय नसल्याच्या चर्चांना उधाण आले.

हेही वाचा – देशातील पहिले ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ महाराष्ट्रात, खगोलप्रेमींसाठी ठरणार खास पर्वणी

पत्रपरिषदेतील महायुतीच्या ‘बॅनर’वर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे छायाचित्र नव्हते. अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वगळता राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला त्यात स्थान नव्हते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, राष्ट्रवादीचे नेते धनंजय दलाल आणि नाना पंचबुधे यांनाही याचे उत्तर देणे अवघड गेले. ‘बॅनर’वर आपल्या नेत्याचे छायाचित्र नाही, हे त्यांच्याही लक्षात आले नव्हते. त्यामुळे या सर्व पक्षांमध्ये खरचं समन्वय आहे का? हे रविवारी होऊ घातलेल्या मेळाव्यात स्पष्ट होईल.

हेही वाचा – एअर इंडियाने नवीन विमान घेतले, पहिल्या लँडिंगसाठी केली “या” विमानतळाची निवड; कारण…

महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन आगामी निवडणुका लढविणार असल्याचे यावेळी भाजप खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. सर्व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी या महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना पंचबुधे यांनी केले. पत्रपरिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, अविनाश ब्राह्मणकर, मयुर बिसेन, रामकुमार गजभिये, हेमंत महाकाळकर, कवाडे गटाचे अनमोल लोणारे, आर.पी.आय.चे (आठवले गट) असित बागडे उपस्थित होते.