नागपूर: व्याजाने दिलेले पैसे परत मागणाऱ्या महिलेचा एका दाम्पत्याने घरात खून केला. त्या महिलेचा मृतदेह फ्रिजच्या थर्माकॉलमध्ये ठेवून जंगलात फेकून दिला होता. या हत्याकांडाचा कपीलनगर पोलिसांनी छडा लावून दाम्पत्याला अटक केली होती. मात्र, एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधार पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे आरोपी दाम्पत्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. सनी हिरालाल सोनी (२६) आणि सोनल ऊर्फ सुवर्णा सनी सोनी (२९) अशी दोषी दाम्पत्याचे नाव आहे.
२ मार्च २०२२ मध्ये नागपूरमधील एका नामांकित शाळेच्या बसवर महिला वाहक असलेल्या दीपा दास यांची सोनी दाम्पत्याने हत्या केली होती. नागपूरमधील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील उप्पलवाडी परिसरात दीपा यांचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन निर्जनस्थळी फेकून देण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला. हे हत्याकांड सनी आणि सोनल या पती-पत्नीने मिळून केल्याचे समोर आले होते.
व्याजाने दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तगादा लावल्याने सोनी दाम्पत्याने तिचा खून केल्याचा आरोप होता. तत्कालिन ठाणेदार शुभांगी वानखेडे यांनी या हत्याकांडाचा कसून तपास केला. एकाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने सोनल आणि सनी यांना जन्मठेपेची शिक्षा दिली.

काय आहे प्रकरण? (Murder News)
नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४१ वर्षीय महिलेची हत्या झाली होती. दीपा जुगल दास असे हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. त्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. दीपा दास या एका शाळेच्या स्कूल बसवर वाहक म्हणून काम करत होत्या. त्यांनी व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यांचा सोनी दाम्पत्यांशी वाद झाला होता. दीपा यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन एक निर्जन स्थळी फेकून देण्यात आला होता. रविवारी परिसरातील लोकांना मृतदेह दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली.
दाम्पत्यच निघाले आरोपी
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी कसून तपास केला असता सनी हिरालाल सोनी आणि सोनल सनी सोनी या पती-पत्नीने दीपा यांची हत्या करुन मृतदेह फ्रीजच्या प्लास्टिक बॅगमध्ये भरुन फेकला असल्याचे स्पष्ट झाले. दीपा दास या बचत गट चालवत होत्या. त्यांनी सोनी दाम्पत्याला कर्ज स्वरुपात काही रक्कम दिली होती. ती रक्कम वसूल करण्यासाठी दास मागे लागल्या होत्या. यामुळे दोघांनी मिळून दास यांची हत्या केली होती.