नागपूर: फेसबूकवर पोलीस निरीक्षकाच्या नावाने बनावट खाते उघडून सायबर गुन्हेगाराने काँग्रेस नेत्याची फसवणूक केली. बदली झाल्याने घरचे साहित्य विक्रीसाठी काढल्याचे सांगून आरोपीने नेत्याची १.१२ लाख रुपयांनी फसवणूक केली. रिजवान खान रुमनवी (रा. आयबीएम रोड, गिट्टीखदान) असे फसवणूक झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव असून त्यांनी घटनेची तक्रार सायबर पोलिसांसह गिट्टीखदान ठाण्यातही केली आहे.
रिजवान शहर काँग्रेस कमिटीमध्ये पश्चिम नागपूरचे अध्यक्ष आहेत. समाजसेवक असल्याने एकेकाळी गिट्टीखदान ठाण्यात तैनात एका पोलीस निरीक्षकाशी त्यांची ओळख होती. दोघांमध्ये नेहमी बोलणेही होत होते. सायबर गुन्हेगाराने पोलीस निरीक्षकाच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. मंगळवारी त्या बनावट खात्यातून रिजवान यांना संदेश पाठवला. या संदेशात, ‘माझी नागपूर बाहेर बदली झाली आहे. त्यामुळे घरचे फर्निचर व इतर वस्तू योग्य किंमतीत लवकरात लवकर विकायचे आहे’ अशी माहिती होती.
हेही वाचा… नागपूर: मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने केली वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण
रिजवान यांनी चॅटिंग दरम्यानच सर्व वस्तू खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आरोपीने सांगितलेल्या खात्यात १.१२ लाख रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर आरोपीने त्यांच्याशी संपर्क तोडला. रिजवान यांनी पोलीस निरीक्षकाशी संपर्क केला असता त्यांच्या नावाने कोणीतरी बनावट खाते उघडल असून लोकांना संदेश पाठवत असल्याचे समजले. रिजवान यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अशाप्रकारे फसवणूक होत असल्याचे माहिती असतानाही ते जाळ्यात अडकले. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.