नागपूर: सायबर गुन्हेगाराने ‘पार्टटाईम जॉब’चे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगार युवकाची तीन लाखांनी फसवणूक केली. पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत फसवणुकीचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरूध्द गुन्हा दाखल केला. ‘टास्क फ्रॉड’मध्ये लाभाची रक्कम हवी असल्यास तीन लाख रुपये भरायला लावून फसवणू केली.

राणी दुर्गावती नगर येथील रहिवासी फिर्यादी सुरजराज शेंडे (३४) हे सध्या खाजगी काम करतात. वेळेचा सदूपयोग व्हावा म्हणून ते पार्टटाईम जॉबच्या शोधात होते. दरम्यान त्यांनी ‘अपना नाम’ हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यावर नोकरीसाठी अर्ज केला. सायबर गुन्हेगाराने त्यांच्या अर्जावरून फोन केला आणि साईड एअर वर्ल्डचे सीएस असल्याची बतावणी करून घरबसल्या जॉब असल्याचे सांगितले. एअर तिकीट बुक करण्याचे काम करावे लागेल असे सांगून फिर्यादीला विश्वासात घेतले.

हेही वाचा… नागपूर: लोखंडी दरवाजा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

नंतर फिर्यादीला टेलिग्राम अ‍ॅपवर जोडून घेतले. टेलिग्राम अ‍ॅपवर अनेक युवक होते. फायदा झाल्याचे “स्क्रीन शॉट’ ते टाकत होते. तसेच लाखांत फायदा मिळत असल्याची माहिती टेलिग्राम अ‍ॅपवर देत होते. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला. त्याने कामाला सुरूवात केली. प्रारंभी फिर्यादीला १५ हजार रुपयाचा लाभ मिळाला. पुढे काम करायचे असल्यास रक्कम गुंतवावी लागेल असे सांगितले. सूरजने त्याच्यावर विश्वास ठेवून २५ हजारांपासून रक्कम गुंतविली. त्यांनी २ लाख ८० हजार रुपये गुंतविले. त्यांना लाभ केवळ ऑनलाईन दिसत होता. लाभाची रक्कम पाहिजे असल्यास तीन लाख रूपये गुंतवावे लागतील, असे सांगितल्यावर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाणे गाठून सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

Story img Loader