सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी गर्भात सात महिन्याचे बाळ दगावले. आठ दिवसांपासून ‘ती’ शस्त्रक्रियेची वाट बघत आहे. रुग्णालय प्रशासनाला विचारल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही. अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील विदारक परिस्थिती बघितल्यास गरिबांना जगण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न  आता उपस्थित होतो आहे.

नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल, मागास अशा अनेक विशेषणांनी गडचिरोली जिल्ह्याला ओळखले जाते. ही ओळख पुसण्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी दिला जातो. दरवेळेस विकासाचा दावा केला जातो. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे परिस्थिती जैसे थे आहे. मागील आठ दिवसांपासून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दुर्गम अशा देचलीपेठा गावातील रहिवासी असलेले सुकांता आणि श्रीनिवास पुजारी हे शेतकरी दाम्पत्य शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा >>> अमरावती : दीड महिन्‍यात तब्बल सहा वेळा गारपीट; चार हजार हेक्‍टरवर पिकांची हानी, नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षाच

आठ दिवसांपूर्वी सुकांताच्या गर्भातील सात महिन्याचे बाळ दगावले. परिस्थिती हालाखीची असल्याने ते शस्त्रक्रियेसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. परंतु,  आठवडाभरापासून त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणी नाही. शस्त्रक्रिया केव्हा करणार असे विचारल्यास आज,उद्या सांगून वेळ मारून नेण्यात येत आहे.  गर्भात मृत बाळ असल्याने सुकांताच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तिचे पाहिले बाळ देखील असेच दगावले होते. त्यामुळे हे दाम्पत्य चिंतेत आहे.

हेही वाचा >>> अबब..! ६७ माजी आमदारांना मिळते मासिक ३४.४४ लाख निवृत्ती वेतन

अहेरी उपविभाग संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी लांबून रुग्ण येतात. मात्र, स्थापनेपासूनच येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुऱ्या सुविधा असल्याने रुग्णांची फरफट होत असते. याविषयी तक्रार देऊ सुध्दा कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे,असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्या महिलेचे यापूर्वी देखील बाळ दगावले होते. तिच्या शरीरात रक्त देखील कमी आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास उपचार करण्यासाठी रुग्णालयात पुरेशा सुविधा नाही. त्यामुळे त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येईल, असे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dead baby in the womb for eight days the woman has been surgery ssp 89 ysh
Show comments