काहीच दिवसांपूर्वीच मोहाडी तालुक्यातील नेरी येथील ५० हून अधिक शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना बुरशीजन्य हरभरा डाळ असलेला ‘आनंदाचा शिधा ‘ वाटप करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. मात्र आठ दिवसातच या प्रकाराची पुनरावृत्ती होत असून मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील एका लाभार्थ्याच्या आनंदाच्या शिधा संचातील हरभरा डाळीत चक्क मेलेला उंदीर आणि बुरशीजन्य डाळ प्राप्त झाल्याने आता शिधा धारकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राज्य सरकार अशाप्रकारचा ‘आनंदाचा शिधा ‘ देवून गोरगरिबांची थट्टा करीत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहे.
मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील विजय पुंडलिक भुरे यांना गावातील रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा मिळाला. मात्र शिधा संचातील हरभरा डाळीला बुरशी लागलेली आणि अतिशय दुर्गंध येत असल्याचे विजय भुरे यांनी सांगितले. पहिल्या संच विजय भुरे यांच्या आईने उघडला असता त्यात मेलेला उंदीर होता तर आतल्या डाळीच्या पॅकेटमध्ये बुरशीजन्य डाळ असल्याचे दिसून आले. या प्रकाराच्या पुनरावृत्तीमुळे आता आनंदाचा शिधा वाटप करताना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या ( एफएसएसआयए) नियमांची पूर्तता होत आहे का ? आणि कंत्राटदाराकडे एनएबीएलचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
हेही वाचा >>>अबब… १२० किलोचे कासव; “तो” आमच्या देवाचा, आमच्या तलावात परत सोडा
जिल्ह्यात २ लाख २९ हजारापैकी १० एप्रिल पर्यंत ४९ शिधा संच प्राप्त झाले होते. मात्र त्यातील हरभरा डाळीला बुरशी लागलेली असल्याचे जवळपास सर्वच संचात दिसून आले. रास्तभाव दुकानदाराला बुरशीयुक्त डाळ परत घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या भूमिकेवर ही आता प्रश्न उपस्थित राहत आहेत. इतरत्र आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मी आनंदाच्या शिधासाठी दिलेले पैसे वाया गेले. महाराष्ट्र शासनाने एक ग्राहक म्हणून माझी फसवणूक केली आहे, हे त्यांनी वाटप केलेल्या पाकिटावरून समजते. शासनाने मला न्याय द्यावा. गावात असेच पाकीट सर्वांना मिळाल्याची माहिती आहे.-विजय कुंडलिक भुरे, रा.डोंगरगाव, ता, मोहाडी जिल्हा भंडारा.