नागपूर: ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी पैठणसह विदर्भातील धापेवडा, रामटेक, माहूर ही तीर्थक्षेत्रे व तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर शंभर टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावी; पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करावी, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथील ‘भव्य वारकरी अधिवेशना’त करण्यात आली.
वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे ‘वारकरी संप्रदाय’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी नारायणानंद सरस्वती’ यांच्या संयुक्त हे वारकरी अधिवेशन घेण्यात आले.
हेही वाचा… Buldhana Accident: वर्ध्यातील एकुण बारा प्रवाशांची आत्तापर्यंत ओळख पटली; सर्वत्र हळहळ
या अधिवेशनात संतमहंत, मान्यवर, हरिभक्त परायण, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल उत्पादने’ विकत घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले. या अधिवेशनासाठी विदर्भातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.