बुलढाणा : बद्रीनाथ केदारनाथच्या यात्रेसाठी बुलढाण्याहून गेलेल्या भाविकांपैकी एक भाविक आज बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुडाल्याचे दुर्देवी वृत्त आहे. उत्तराखंड एसडीआरएफतर्फे हेलिकॉप्टरच्या मदतीने युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे संबंधित कुटुंब व सोबतचे भाविक हवालदिल झाले आहे.
चिखली (जिल्हा बुलढाणा) येथील जय अंबे ट्रॅव्हल्सचे संचालक सचिन मनोहरभाई चौहान यांनी याची पुष्टी केली आहे. ट्रॅव्हल्सच्या बसने बुलढाणा व चिखली येथील एकूण २४ जण बद्रीनाथ व केदारनाथ दर्शनासाठी गेले होते. आज गुरुवारी सकाळी या भाविकांनी दर्शन व पिंडदान विधी केले. यातील एकजण बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुडाला आहे. दिलीप रघाणी (रा. बुलढाणा) असे त्यांचे नाव आहे.
उत्तराखंडच्या एसडीआरएफची टीम दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध घेत असल्याचे ट्रॅव्हल्सचे सचिन यांनी सांगितले. २ चमू नदीत तर १ चमू काही अंतरावर असलेल्या धरणात शोध घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिमालयातून येणाऱ्या अलकनंदाच्या प्रवाहाचा वेग जास्त असतो. शिवाय पात्रात मोठे दगड आहेत.