नागपूर: शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे नागपूर पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. लकडगंज पोलीस ठाण्यातील एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने सक्करदरा वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण केली. या प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी आदित्य ऊर्फ अभिषेक श्रीकांत ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले. तर दुसरीकडे युनीट तीनचे तीन कर्मचारी चौकीतच जुगार खेळताना आढळल्याने निलंबित केले, हे विशेष.
आदित्य ठाकूर हे लकडगंज पोलीस ठाण्यात बीट मार्शल पदावर कार्यरत आहेत. तर जखमी पोलीस कर्मचारी हर्षद इंदल वासनिक हे सक्करदरा वाहतूक शाखेत कार्यरत आहे. रविवारी पहाटे तीन वाजता हर्षद वासनिक हे भांडे प्लॉट चौकात नाकाबंदीसाठी कर्तव्यावर होते. पहाटेच्या सुमारात ते दुचाकीने घरी जात होते. मेहंदीबाग पुलासमोरून जात असताना पोलीस कर्मचारी आदित्य ठाकूर पार्टी करून मित्रासह परत येत होते. ‘तुझे नाव काय आहे आणि तू कोणत्या पोलीस ठाण्यात करतोस सांग?’ असा प्रश्न केला. हर्षद यांनी नाव सांगितले आणि जायला लागला.
हेही वाचा… महिलाराज! नवीन अमरावती रेल्वे स्थानक बनले भुसावळ विभागातील पहिले ‘पिंक स्टेशन’ !
मात्र, आदित्य ठाकूरने ‘तुझ्या पीआयला माझे नाव विचार, तो ओळखतो मला.’ असे म्हणून हर्षद यांची कॉलर पकडून मारहाण केली. दगड घेतला आणि डोक्यावर मारल्याने हर्षद जखमी झाले. शांतीनगर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. त्यांनी दोघांनाही ठाण्यात आणले. हर्षद यांच्या तक्रारीवरून आदित्य ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी लकडगंज ठाण्यातील आदित्य ठाकूरला निलंबित केले.