यवतमाळ: बनावट फेसबुक खाते तयार करून ओळखीच्या लोकांना पैसे मागण्याचा फंडा फ्रॉडर्सकडून अवलंबला जात आहे. याचा फटका येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनाही बसला. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने प्रशासन आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
अँड्रॉइड मोबाइल वापरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचेच फेसबुक अकाउंट आहे. त्याद्वारे मित्र व नातेवाइकांच्या संपर्कात राहता येते. बडे अधिकारी, व्यावसायिक यांच्या नावाने बनावट फेसबुक तयार करण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. या खात्याद्वारे फ्रेंडलिस्टमधील मित्रांना रिक्वेस्ट पाठविली जाते. रिक्वेस्ट ओळखीच्या व्यक्तीची असल्याने तिला तत्काळ अॅक्सेप्ट केली जाते. त्याद्वारे फ्रॉडर्स फ्रेंडलिस्टमधील लोकांना मी अडचणीत आहे. पैशाची अडचण आहे, असा बनाव करून पैशाची मागणी करतात.
हेही वाचा… मोदी यांचे कार्य नेमक्या शब्दात मुनगंटीवार यांनी मांडले – फडणवीस
यापूर्वी असाच प्रकार तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासोबतही घडला होता. याचप्रकारे सायबर फ्रॉडर्सने चक्क जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केले. हा प्रकार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून परिचयातील लोकांना सावधान केले. याप्रकरणी जिल्हाधिकारी येडगे यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. २ ते १७ जून कालावधीत फेसबुक अकाउंट बनविले. मित्र, ओळखीचे लोक व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होईल, असे कृत्य केले, असा उल्लेख तक्रारीत आहे. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. बनावट फेसबुक अकाउंट बनविणार्या तोतयाचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे.