नागपूर : विटाभट्टीवर रोजमजुरी करण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाने रस्त्याच्या कडेला संसार थाटला. पत्नी स्वयंपाक बनवत होती तर पती दोन मुलांसह जेवन करीत होता. यादरम्यान काळ बनून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्या कुटुंबियांना चिरडले. या विचित्र अपघातात पती-पत्नी व दोन मुले गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री आठ वाजता कोराडीत झाला. खुमानसिंह मेश्राम (४०), पत्नी श्यामकली (३५), मुलगा तिलक (१०) आणि मुलगी (८) अशी जखमींची नावे आहेत.
हेही वाचा – मराठा आरक्षण तिढा २५ डिसेंबरपूर्वी सुटणार, मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटील म्हणतात..
खुमानसिंह मेश्राम हे सुरादेवी, कोराडीत असलेल्या इमलेच्या विटाभट्टीवर मोलमजुरी करीत होते. त्यांनी रस्त्याच्या कडेलाच एका कापडाचे पाल टाकून संसार थाटला. सोमवारी रात्री आठ वाजता श्यामकली या दगडाच्या चुलीवर स्वयंपाक बनवित होत्या तर पती खुमानसिंह हे दोन्ही मुलांसह जेवन करीत होते. दरम्यान एक भरधाव ट्रॅक्टर त्यांच्या झोपडीकडे आला. चौघांनाही चिरडून निघून गेला. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.