बुलढाणा: सावकाराचा जाच असह्य झाल्याने एका वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने पोलिसांच्या नावाने ‘मृत्यूपत्र’ लिहिले असून मनगटावर सावकाराचे नाव लिहिले आहे. मेहकर तालुक्यातील उकळी येथे आज मंगळवारी ही धक्कादायक बाब उघड झाली. यामुळे मेहकर तालुक्यासह कृषिप्रधान बुलढाणा जिल्हा हादरला आहे. उद्धव परसराम मानवतकर (६०, रा. उकळी) असे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा – नागपूर : कोराडीतील राख बंधाऱ्याच्या आतील पाण्याचा बंधारा फुटला.. आठ ट्रक पाण्यात बुडाले
अल्पभूधारक शेतकरी असलेल्या उध्दव मानवतकर यांनी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. मेहकर येथील सुनील तिफने पाटील, त्यांचा पुतण्या आणि मुलगा अमर सुनील तिफने यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे शेतकरी उद्धव मानवतकर यांनी ‘मृत्युपत्र’मध्ये नमूद केले आहे. त्यातील मजकुरानुसार त्यांनी २८ ऑक्टोबर २०२२ रोजी सावकार सुनील तिफने यांच्याकडून २० हजार रुपये घेतले होते. त्यातील १० हजार रुपये परत केले असतानाही तिफने पाटील यांनी ८० हजार रुपये मागितल्याचे शेतकऱ्याने पत्रात लिहिले आहे. मानवतकर याने तुम्ही काय भावाने व्याज लावले अशी विचारणा केली असता “तू घरी ये हिशोब सांगतो” असे सावकाराने म्हटले होते. दिनांक २ जानेवारी २०२४ ला सुनील तिफने याचा पुतण्या आणि मुलाने शेतकऱ्याला घरी नेले. घरात गेल्यावर दरवाजा लावून शिवीगाळ केली, तू आमचे पैसे कसे देत नाही, आमचे व्याज आमच्या हिशोबाने आहे..तू जर आठ दिवसांच्या आत पैसे दिले नाही तर तुझ्या घरी येऊन टिव्ही, फ्रिज काढून घेऊ अशी धमकी सावकाराने दिली. शेतकऱ्याने सावकाराला दोन महिन्यांची मुदत मागितली, “मी येवढे पैसे देऊ शकत नाही” असे म्हटले असता सावकाराने शेतकऱ्याच्या मोटरसायकलची चाबी घेऊन हाकलून दिले, आधी पैसे आणून दे नंतर गाडी घेऊन जा असे सावकाराने म्हटल्याचे शेतकरी मानवतकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. झालेला अपमान असह्य असल्याने आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहला नाही” असेही शेतकऱ्याने चिठ्ठीच्या शेवटी म्हटले आहे.