शेतात हरभऱ्याची काढणी करायला गेलेल्या शेतकऱ्याला गवतात निद्रावस्थेत असलेला वाघ दिसला. तो तसाच मागे फिरला आणि शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांना वाघ असल्याचे सांगून तेथून पळ काढला. ही घटना मोहाडी तालुक्यातील धोप शेतशिवरात आज, बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
हेही वाचा >>>नागपूर : होळी-धुळवडीला ५ हजारजणांवर कारवाई
सध्या शेतात हरभऱ्याची काढणी सुरू आहे. धोप गावातील शेतकरी प्यारेलाल रतन सपाटे हे ४ ते ५ मजुरांसह हरभरा काढायला शेतात गेले. हरभरा काढत असतात त्यांना काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले. थोडे पुढे जाताच गवतात वाघ असल्याचे त्यांनी पाहिले. समयसूचकता दाखवत त्यांनी मजुरांना वाघ असल्याचे सांगितले. सगळ्यांनी गावाकडे धूम ठोकली. क्षणात ही माहिती अख्ख्या पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. वाघ बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. लोकांच्या गोंधळाने वाघ सैरभैर झाला आणि सैरावरा पळू लागला. तो जवळच असलेल्या उमेश सपाटे यांच्या शेतात गेला. त्याला हुसकावून लावण्यासाठी नागरिक त्याच्या मागे धावू लागले. जवळ आलेल्या एकाच्या दिशेनेही वाघाने झेप घेतली. मात्र, नागरिकांनी आरडाओरडा करायला सूरवात केली आणि त्याने ‘यू टर्न’घेतला. अखेर जवळच असलेल्या नाल्याच्या दिशेने वाघ निघून गेला.
हेही वाचा >>>बुलढाणा : चिखली राज्यमार्गावर आढळला युवकाचा मृतदेह
वन विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. मात्र, या वेळीही वाघाला निव्वळ हुसकावून लावण्याचे काम करून वन विभागाने धन्यता मानली. वारंवार या घटना घडत असताना वन विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, परिसरातील लोकांचा जीव धोक्यात असताना वनविभाग कशाची वाट पाहत आहे, असा प्रश्न धोपचे रुपेश सपाटे यांनी उपस्थित केला आहे.
कायमस्वरूपी तोडगा का नाही?
मोहाडी तालुक्यातील धोप- ताडगाव शिवारात आतापर्यंत चार ते पाच वेळा वाघाचे दर्शन झाले. वन विभागाचे पथक दरवेळी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करून तात्पुरता मलमपट्टी करून जाते. मात्र यासाठी कोणताही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात कुणाचा जीव गेल्यावर वन विभागाला जाग येईल का, असा प्रश्न आता परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.