बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा आज मृत्यू झाला.सुनिल निवृत्ती झिने ( ३८) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते आज शनिवारी संध्याकाळी शेतात काम करीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. देव्हारी गावचे रहिवासी सुनिल झिने यांची अभयारण्याच्या सीमेवर शेती आहे. शेतात काम करीत असतांना मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला परंतु तो अपुरा पडला.
सुनिल झिनेच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन आसपासच्या शेतीतील माणसे घटनास्थळी धावली. त्यांनी बिबट्याला पिटाळून लावले. घटनेनंतर वन्य जीव चे अधिकारी उशिरा देव्हारीत दाखल झाले नाही.वन्यजीव अधिकारी चेतन राठोड लोणार येथे आयोजित बैठकीला गेले होते, असे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे देव्हारीच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.