यवतमाळ : उमरखेड येथे एका शाळेत पाचव्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेस दुचाकीवर शाळेत सोडून देण्याच्या बहाण्याने नेऊन सराईत गुन्हेगाराने अत्याचार केला. या घटनेनंतर उमरखेड येथील वातावरण चांगलेच तापले आहे. पीडित बालिकेला भेटण्यासाठी अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोक येत आहे. मात्र भाजपच्या गोटात राहणाऱ्या मुंबई येथील एका महिला डॉक्टरला पीडित बालिकेच्या भेटीदरम्यानचे ‘क्षण’ समाज माध्यमातून व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी या प्रकरणी प्राप्त तक्रारीची गंभीर दखल घेत डॉ. सायली शिंदें यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. शिंदे यांनी बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या  महिला डॉक्टर मुंबईतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. राजकीय महत्त्वाकांक्षेतून त्या उमरखेड मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत व सध्या उमरखेड येथे काही काळ वास्तव्य करतात.

हेही वाचा >>> “उदयपूर ठरावावर चर्चा होऊ नये म्हणूनच…”, नरेंद्र जिचकार यांची काँग्रेसाध्यक्षांकडे तक्रार

लैंगिक अत्याचारग्रस्त कुठल्याही पीडित बालिकेचे अथवा महिलेचे नाव पुढे येणार नाही, अथवा कुणी त्यांची ओळख उघड करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. असे असताना डॉ. सायली शिंदे यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि केवळ जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी पीडित बालिकेचे भेटीदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. ही बाब स्थानिक व्यावसायिक लक्ष्मीकांत मैड यांच्या येताच तत्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली.

हेही वाचा >>> “सुप्रिया सुळेंना जवळचा चष्मा!”; ‘अदृश्य शक्ती’वरून गोपीचंद पडळकरांची टीका म्हणाले, “बारामती आरक्षित…”

डॉ. साईली शिंदे यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अन्य कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच उमरखेड येथील राहत्या घरून त्यांना पोलिसांनी आज दुपारी अटक केली. पुसद न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी दिली. या घटनेने उमरखेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A female doctor from mumbai arrested for viral posting pictures of a victim on social media nrp 78 ysh
Show comments