वारसा हक्कासाठी सख्खी भावंडं एकमेकांशी भांडताना आपण कित्येकदा पाहिली आहेत, पण प्राण्यांच्याही बाबतीत हे होत असेल का! त्यांच्यातही भांडणं होतात. अगदी माणसासारखी. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतच नाही तर अगदी एकमेकांच्या मानगुटीवर बसण्यापर्यंत. मात्र, त्यांची ही भांडणं होतात ती अधिवासासाठी.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हे चित्र दररोज बघायला मिळते. येथे कित्येकदा अधिवासाच्या, अस्तित्वाच्या, वाघिणीवर हक्क दाखवण्यासाठी लढाईत एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत वाघाची मजल गेली आहे. नुकतेच “तारू” आणि “बजरंग” या दोन वाघांमध्ये अस्तित्वासाठी, अधिवासासाठी अटीतटीची लढाई झाली. काही दिवसांपूर्वी “छोटी मधु” या वाघिणीचे मन जिंकण्यासाठी व अधिवासासाठी “पारस” व “तारु” या दोन वाघांमध्ये जुंपली होती. तर धिप्पाड शरीरयष्टीच्या “बजरंगा”ने बाहेरून येत ताडोबात आपले अस्तित्व निर्माण केले. अगदी वाघिणीसाठी त्यांच्या बछड्यांचाही बळी घेतला. मात्र, आगरझरी वनक्षेत्रात झालेल्या युद्धात “तारू” “बजरंग” वर भारी पडला आणि त्याने बजरंगाला हाकलून लावले. या तुंबळ युद्धात शेवटी “तारू” विजयी ठरला. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार राहूल कूचनकर यांनी दोन वाघांमधील ही लढाई त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली.