बुलढाणा : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या यंदाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीने, प्रचाराच्या अंतिम व निर्णायक टप्प्यात भाजपसमोर कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. परिणामी यंदा तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यंदाही विक्रमी सलग तिसऱ्या विजयाच्या जिद्दीने मैदानात उतरले.
नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आघाडीने नवख्या धीरज लिंगाडे यांना मैदानात उतरवले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. यामुळे नेत्यांची नाराजी फारशी मनावर न घेता भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी स्वतःची प्रचार यंत्रणा राबवली. दोन ‘टर्म’ चा अनुभव, पाच जिल्ह्यातील संपर्क, केलेली कामे, निवडणुकीचा सूक्ष्म अनुभव आणि पक्षाची अभेद्य मते ही त्यांची जमेची बाजू आहे. सुनियोजित प्रचारावर पाटील यांचा भर आहे. त्यांनी संस्था चालकांवर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे वृत्त आहे.
आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई
आघाडीचे धीरज लिंगाडे यांना मोठ्या निवडणुकीचा वैयक्तिक अनुभव नाही. मात्र, काँग्रेसच नव्हे आघाडीनेच ही निवडणूक प्रतिष्ठेची बाब केली आहे. लिंगाडे यांच्या घरवापसी व उमेदवारीमध्ये निर्णायक भूमिका असणारे अमरावतीकर सुनील देशमुख व मिलिंद चिमोटे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वैय्याक्तिक लक्ष घातल्याने पाचही जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिकारी प्रचाराला जोमाने भिडले आहे. धीरज लिंगाडे यांचे दिवंगत वडील माजी मंत्री रामभाऊ लिंगाडे व राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सत्तरीच्या दशकात प्रदेश युवक काँग्रेसमध्ये सोबत काम केले आहे. आघाडीला दुखावलेली ‘नूटा’ , व्हिज्युकट्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ या संघटनाची जोड आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पाठबळ ही जमेची व गठ्ठा मतदानाची बाजू ठरावी.
हेही वाचा >>> संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन
दुसऱ्या पसंतीची मतेही निर्णायक?
लिंगाडे नवखे असले तरी आघाडीने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपसमोर चांगले आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. मुळात ही लढत रणजित पाटील विरुद्ध आघाडी अशा पातळीवर येऊन ठेपली आहे. यामुळेच की काय, प्रारंभी एकतर्फी भासणारी ही लढत आता तुल्यबळ स्थितीत आली आहे. परिणामी लढतीचा निकाल पहिल्या पसंतीच्या मतांवर लागण्याची शक्यता कमी आहे. यास्थितीत दुसऱ्या पसंतीच्या मतानाही महत्त्व आले आहे. ‘वंचित’चे अनिल मामलकर यांच्यासह उर्वरित २१ उमेदवारांमुळे होणारे मत विभाजन हा देखील निकालात कळीचा मुद्दा ठरू शकतो.