यवतमाळ: वणी येथील निळापूर-ब्राह्मणी मार्गावरील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागून दोन ते अडीच हजार क्विंटल कापूस व सरकी जळाली. यावेळी फॅक्टरीत २५ मजूर काम करत होते. प्रसंगावधान राखून ते सर्वजण बाहेर पडल्याने सुदैवाने बचावले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीचे राजा एक्जीन जिनिंग-प्रेसिंग आहे. फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम ५६ स्पिन मशीनवर सुरू होते. कापूस वाहक पट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी उडाल्याने आग लागली असावी, असा अंदाज आहे. दोन हजार क्विंटल कापूस, एक हजार क्विंटल सरकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधून प्रचंड प्रमाणात धूर निघत होता. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. हे तालुक्यातील सर्वांत मोठे युनिट आहे.
हेही वाचा… धक्कादायक! पाळीव कुत्र्यांनीच तोडले मालकाच्या शरीराचे लचके
याठिकाणी दररोज दोन हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात येते. ही आग लावली की या घटनेमागे घातपात आहे, याबाबत विविध चर्चा वणी शहरात सुरू आहे.