पहाटे दोन वाजताची वेळ. थंडीमुळे सर्वत्र शुकशुकाट. लाखनी उड्डाणपुलावर वाहनांची तुरळक गर्दी. अशातच, एक ट्रक उड्डाणपुलावर धावत असतानाच अचानक पेट घेतो. पाहता पाहता ट्रकला लागलेली आग रौद्ररूप धारण करते. जिल्ह्यातील लाखनी उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास ‘बर्निंग ट्रक’चा थरार अनेकांनी अनुभवला. किराणा साहित्य आणि ऑईल पेंट वाहून नेणा-या एका ट्रकने अचानक पेट घेतला.
घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळिवले. पहाटेची वेळ असल्यामुळे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ नव्हती. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैनाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.