लोकसत्ता टीम
चंद्रपूर: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातून मंगळवारी पहाटेच्या सुमारास चार दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.तसेच सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका चार दिवसीय बालकाची चोरी झाली. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रसुत झाली. बाळ व आई सुखरूप असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास महिलेच्या शेजारी असलेले बाळ दिसेनासे झाले. सुरुवातीला नातेवाईकांनी बाळाला कोवळे उन्ह दाखवायला बाहेर नेले असेल असा मातेचा समज झाला मात्र नातेवाईकांनी बाळाला बाहेर नेले नसल्याचे स्पष्ट होताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा… समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; दोघांचा जळून मृत्यू
रुग्णालयात सर्वत्र शोधाशोध करूनही बाळ आढळून न आल्याने पोलीस तक्रार देण्यात आली असुन ह्या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन तसेच रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात सुरक्षेसाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले असुन त्यांचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे मात्र बरेचदा हे सुरक्षा रक्षकांना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खाजगी कामासाठी सुद्धा तैनात व्हावे लागते त्यामुळे अर्थातच सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडल्या जाते. पोलिसांना तक्रार प्राप्त होताच रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणे सुरू केले आहे. दरम्यान पोलिस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झालेले बाळ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मिळाले आहे. काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.