नागपूर : ‘एटीएम’ मशीनचे तांत्रिक ज्ञान घेतल्यानंतर देशभरातील शेकडो ‘एटीएम’ मशीन फोडून लाखो रुपये चोरणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला तहसील पोलिसांनी अटक केली. या टोळीने नागपुरातील तब्बल ३३ ‘एटीएम’ फोडून रक्कम उडवली आहे.राहुल राकेश सरोज (२४, खंडवा, प्रतापगढ-उत्तरप्रदेश), संजयकुमार शंकरलाल पाल (मुनव्वरपूर, प्रयागराज) आणि अशोक श्रीनाथ पाल (प्रयागराज) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर विनोद बडेलाल सरोज आणि मोनू लल्लू सरोज (प्रतापगढ-उत्तरप्रदेश) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी एका टोळीला अटक केली होती. त्या टोळीने देशभरात ‘एटीएम’ फोडून लाखोंची रक्कम चोरी केली होती. हीच टोळी नागपुरातही वारंवार येत होती. या टोळीने नागपुरातील ३३ ठिकाणचे ‘एटीएम’ तंत्रज्ञानाचा वापर करून फोडले. त्यातील मोठी रक्कम उडवली. या टोळीला तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : मुंबईतील हॉटेलमध्ये ४० वर्षीय मॉडेलची आत्महत्या; मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला
मोनू सरोज हा टोळीचा म्होरक्या असून तो टेहळणी करून सुरक्षारक्षक नसलेले ‘एटीएम’ शोधतो व वेगवेगळ्या पद्धतीने ‘एटीएम’ मशिनमधील पैसे काढतो. या टोळीने गुजरात, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, कटनी-मध्यप्रदेशसह अन्य राज्यातील ‘एटीएम’ फोडून लाखो रुपये लंपास केले आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विनायक गोल्हे, संदीप बागूल यांनी केली.