भंडारा : शहरातील नगर परिषदेच्या क्रीडा मैदानावर भिक्षेकऱ्यांची एक टोळी मागील तीन महिन्यांपासून तळ ठोकून आहे. मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर या टोळीने अतिक्रमण केले आहे. हे भिक्षेकरी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून किंवा धमकी देत भिक्षा मागत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, टोळीतील पुरुषांसह महिलासुद्धा ड्रग्ज आणि गांज्याचे सेवन करीत असून विक्रीही करत असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.
शहरातील जे.एम. पटेल महाविद्यालय मार्गावर नगर परिषदेचे एक मैदान असून हे मैदान लहान मुलांना खेळण्यासाठी राखीव आहे. या मैदानावर अनेकदा टूर्नामेंट होत असतात. मार्च महिन्यात खासदार चषक झाले असून अनेक वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा खेळण्याचा मानही या मैदानाला मिळालेला आहे. मात्र आज हे मैदान भिकाऱ्यांच्या एका टोळीसाठी ड्रग-गांजाचा अड्डा बनले आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नगर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील काचेवाणी येथून २५ ते ३० भिकाऱ्यांची ही टोळी मागील तीन महिन्यापासून या मैदानावर तळ ठोकून आहे. काही दिवस ही टोळी ग्रामसेवक कॉलोनीच्या रिकाम्या मैदानावर राहत होती. मात्र तेथील नागरिकांनी त्यांना तेथून हाकलून लावले. त्यानंतर काही दिवस त्यांनी बजाज फायनान्सच्या इमारतीखाली आपले बस्तान मांडले. मात्र तेथूनही त्यांना हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा नगर परिषदेच्या या मैदानाकडे वळविला. या मैदानातच उघड्यावर त्यांनी संसार थाटला आहे. टोळीतील महिला आणि लहान मुले दिवसभर मैदानावर पडून असतात किंवा ये जा करणाऱ्यांना भीक मागत असतात. महिलांनी त्यांच्या मुलांसाठी मैदानातील झाडांवर चक्क झोके बांधले आहेत आणि आवारभिंतीचा वापर कपडे वाळविण्यासाठी करतात. दिवसा पुरुष परिसरात भीक मागण्यासाठी जातात.
धमकीवजा भाषेत ते भीक मागतात आणि दिली नाही तर शिवीगाळ करून हैराण करीत असल्याचे परिसरातील एका महिलेने सांगितले. हे भिकारी नशेतच भीक मागत फिरत असल्याने घराबाहेर पडताना आम्हाला सतत असुरक्षित वाटत असल्याचेही एका नोकरदार महिलेने सांगितले. सायंकाळच्या सुमारास महिला लहान लेकरांसह भीक मागण्यासाठी बाहेर पडतात. मैदानाच्या अगदी समोर चौपाटी असून येथे येणाऱ्यांना या महिला आणि लहान मुले भीक मागून त्यांच्या नाकी नऊ आणतात. या टोळीतील महिला-पुरुष ड्रग्स आणि गांज्याचे नियमित सेवन करतात.
हेही वाचा >>> अमरावती : पायावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
एवढेच नाही तर रात्रीच्या सुमारास ते छुप्या मार्गाने विक्रीही करीत असल्याची गोपनीय माहिती आहे. याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या आधी एकदा या टोळीला येथून हटविले होते मात्र ते पुन्हा आले आहेत. माणुसकीच्या नात्याने त्यांना मैदानावर राहण्यास मज्जाव करता येत नाही, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य होत असतील तर पोलीस प्रशासनाने याबाबत माहिती द्यावी, ताबडतोब त्यांना हटविले जाईल असे आश्वासन जाधव यांनी दिले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी याबाबत माहिती काढून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
सध्या शहरात वाढलेल्या गुन्हेगारी मागे ड्रग्स आणि गांजाचे व्यसन हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अशा प्रकारे भीक मागण्याच्या नावाखाली ड्रग्स आणि गांजाची विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करते ते बघणे महत्वाचे आहे. पोलीसांनी रात्रीच्या वेळी नियमितपणे पेट्रोलिंग केल्यास या टोळीचा भांडाफोड होणे अवघड नाही. शहरात गांधी शाळेच्या परिसरात अशा भिकाऱ्यांसाठी शेल्टर होम असूनही नगर पालिका त्यांना येथे ठेवण्यास असमर्थ का ठरत आहे हा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. नगर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आता यावर कोणती कायमस्वरूपी तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.