यवतमाळ : महागाव तालुक्यातील गुंज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागत कार्यक्रमात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पैसे उडविणार्या सात पाकीटमार चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून पाच लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
सय्यद अतिक सय्यद सादीक (२५, रा. मोतीनगर, दिग्रस), शेख अतिक शेख गफ्फार (२३, रा. मोतीनगर), अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार (५५, रा. चांदनगर), शाहरूख खान नासीर खान (३०, रा. मोतीनगर), शेख इस्माईल शेख चांद (४२, रा. मोतीनगर), परवेज खान एहेसानउल्ला खान ३३,रा.चांदनगर), राजा मधुकर तांडेकर (३०, रा. मोतीनगर), अशी अटक करण्यात आलेल्या पाकीटमारांची नावे आहेत.
हेही वाचा – वर्धा : चक्क पतीच निघाला दुचाकी चोर, होता भलताच डाव…
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव परिसरात मंगळवार ते गुरुवार या कालावधीत दौरा होता. यापूर्वी झालेल्या सभेत झालेल्या चोरीच्या घटनांमुळे खबदरदारी घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तैनात करण्यात आले होते. बुधवारी गुंज येथे स्वागत कार्यक्रमातून पाकीटमारीच्या घटना घडल्या. पथकाने शोधमोहीम व स्वत: निरीक्षण करून चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाईल, रोख आठ हजार ६० रुपये, कार व ऑटो असा एकूण पाच लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सातही चोरटे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
गर्दी असणार्या ठिकाणी जाऊन पाकीटमारीसह चोरी करतात. या चोरट्यांच्या टोळीविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुनील पंडागळे, राजेश जाधव आदींनी केली.
चोरीनंतर हिस्सेवाटणी
दिग्रस येथील चोरट्यांची टोळी गुंज येथे एक ऑटो व चारचाकी वाहनाने चोरी करण्यासाठी आली होती. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांना चहा टपरीजवळ संशयित वाहन दिसले. त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, चोरीची कबुली दिली. वाहनाने गर्दीच्या ठिकाणी जायचे. हातसफाईने पाकीटमारी व चोरी केल्यावर सर्व रक्कम एकत्र जमा करून नंतर हिस्सेवाटणी करायचे.