वर्धा : सराफा व्यवसायिकास लुटणाऱ्या व लुटीचे दागिने खड्ड्यात पुरणाऱ्या टोळीस २४ तासात अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. त्यांचे या तपासाचे कौतुक करीत त्यांना ५० हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले आहे.हिंगणघाट येथील वणा नदीच्या पुलावर वडनेरच्या सराफा दुकानदारास रस्त्यात अडवून लूटमार करण्यात आली होती. सुभाष विनायक नागरे हे सुवर्णकार हे वडनेर येथील दुकान बंद करीत दागिने व रोख सोबत घेऊन रात्रीस हिंगणघाटला दुचाकीने निघाले होते. त्यावेळी त्यांना पाच दरोडेखोरांनी रस्त्यात अडवून चाकूने वार केले. त्यांच्याकडे असलेले दागिने व रोख असा १३ लाख ४३ हजार रुपयाचा ऐवज जबरीने हिसकावून घेत पलायन केले.

तपास करतांना नागरे यांच्या दुकानाजवळ सुरेश व कुणाल हे संशयस्पद स्थितीत फिरत असल्याचे सिसिटीव्हीत दिसून आले. त्यांची चौकशी केल्यावर गावातीलच गोलू हा या लूटमारीचा सूत्रधार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला अन्य साथीदारसह अटक करण्यात आली. लूटमार केल्यावर वडनेर लगत एका झाडाखाली खड्डा खोदून लुटीचा माल लपविण्यात आला होता. पोलिसांनी त्या जागी पोहचून सोन्याचांदीचे दागिने, वापरलेला चाकू, रोख, दुचाकी, पाच मोबाईल, बॅग असा १५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी सुरेश राजू इटणकर, कुणाल दशरथ दुर्गे रा. वडनेर तसेच गोलू पंजाबसिंह टाक, हड्डी नेपालसिंग बावरी व वीरा कालूसिंग भादा रा. शिखबेडा सावंगी मेघे यांना २४ तासात अटक करण्यात आली.

हेही वाचा >>>भाच्याच्या सुखी संसारात ‘शकुनी’ मामीने संशयाचे विष पेरले, पण भरोसा सेलने…

लुटीचा कट गावातच शिजला होता. सुरेश व कुणाल हे नागरे यांच्या सौभाग्य ज्वेलर्स परिसरातच राहतात. त्यांनी दुकानमालक किती वाजता दुकान बंद करतो, कुठल्या रस्त्याने जातो व अन्य माहिती गोलूस दिली. घटनेच्या दिवशी हे दोघे मालक नागरे यांच्यावर पाळत ठेवुनच होते. नागरे निघताच सुरेशने तशी माहिती पुलावर दबा धरून बसलेले गोलू व त्याचे साथीदार यांना दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगणघाट व वडनेर येथील पोलिसांच्या सहा तपास चमू गठीत केल्या. या जबरी चोरीतील सर्व गुन्हेगार व चोरीचा ऐवज याचा तत्परतेने छडा लावल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच ५० हजार रुपयाचा रिवार्ड पण तपास चमूस देण्यात आला.

हेही वाचा >>>‘मुन्ना भाई एमबीबीएस’ डॉक्टरांची ओळख पटविणे झाले सोपे; ‘क्यूआर कोड’ स्कॅन करा अन्…

पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक अमोल लगड तसेच सलाम कुरेशी, संतोष दरगुडे, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, यशवंत गोल्हर, भूषण निघोट, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, मनीष कांबळे, रामकिसन ईप्पर, राकेश आष्टाणकर, गोपाल बावणकर, मंगेश आदे, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के यांनी ही कामगिरी अधीक्षक हसन तसेच अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात केली. आता पुढील तपास हिंगणघाट येथील उपनिरीक्षक भारत वर्मा तसेच प्रवीण देशमुख व प्रशांत ढोबरे हे करीत आहे.

Story img Loader