भंडारा : सध्या समाज माध्यमांवर एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ अफवा असून, अशा प्रकारची घटना जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले आहे. तुमसरच्या निलज गावातील एका कचरा गोळा करणाऱ्याला रविवारी गोंदियात याच संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात चर्चांना ऊत आला आहे.
जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा समाज माध्यमांतून पसरविली जात आहे. अशा प्रकारची कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेल्याची घटना जिल्ह्यात किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नाही. जिल्ह्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नसून, अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नसल्याचाही दावा मतानी यांनी केला आहे.
दिवस-रात्र गस्त
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांची दिवस-रात्र गस्त सुरू असल्याचे मतानी यांनी सांगितले.
हेही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला ‘ते’च जबाबदार ; आमदार संजय गायकवाड
कुठे झाली सुरुवात?
लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरविणारी चित्रफित सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. यात काही नागरिक एकाला मारहाण करताना दिसत आहे. लहान मुलाला पळवून नेताना या व्यक्तीला पकडल्याचे आणि त्याचे इतर सहकारी जिल्ह्यात फिरत असल्याचे या चित्रफितीत दाखवण्यात आले आहे. यातूनच नागपूर (लकरगंज), तुमसर (निलज) यासह विविध शहरातील चार जणांना गोंदिया येथे बेदम मारहाण करण्यात आली. गोंदिया पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते कचरा व रद्दी गोळा करणारे असल्याचे स्पष्ट झाले. अशाच प्रकारे लहान मुलांना पळवून नेणारी टोळी भंडारा जिल्ह्यातही सक्रिय असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, ही चित्रफित खोटी असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.