अमरावती: शहरातील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना रोपटे भेट देऊन त्यांचे संवर्धन करण्याची विनंती केली जाणार आहे. यामुळे वृक्षारोपणाला तर प्रोत्साहन मिळेल, तसेच मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ लावल्या जाणाऱ्या रोपट्याचेही संगोपन होणार आहे. येत्या १ जुलैपासून या उपक्रमाला सुरूवात होणार आहे.
हिंदू स्मशान संस्थेने पर्यावरण रक्षणासाठी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. अंतिम संस्कारासाठी लाकडाचा वापर केला जातो. यासाठी वाळलेली झाडे किंवा बांधकामात अडसर ठरणारी परवानगीने तोडलेली झाडे तसेच इतरही झाडे लागतात. अशा तोडलेल्या झाडांची संख्या तर भरून निघणार नाही.
हेही वाचा… राज्यात नऊ नव्या RTO कार्यालयांचा मार्ग मोकळा; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची शासनाकडून दखल
परंतु, प्रत्येकाने प्रिय व्यक्तीच्या स्मृतीत जर झाड लावले तर त्यामुळे पर्यावरणाचा हास होणार नाही. जीवलगाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आघात होतो. ते स्वर्गीय व्यक्तींच्या लावून चालणार नाही तर त्याला आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात.
स्मशानभूमीकडून रोपटे भेट मिळाल्यानंतर कुटुंबीय ते योग्य ठिकाणी लावतील. त्याचा घरातील सदस्याप्रमाणेच सांभाळ करतील. त्याला पाणी, खत घालतील, त्याची मशागत करतील. मृत व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याचा हा एक पर्याय असल्याचे मत हिंदू स्मशान संस्थेचे अध्यक्ष अॅड आर.बी. अटल यांनी व्यक्त केले.