अमरावती: एका अल्पवयीन विद्यार्थिनीला महाविद्यालयासमोरच एका माथेफिरू तरूणाने जबर मारहाण केल्याची घटना दर्यापूर येथे घडली. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाच्या विरोधात विनयभंग, मारहाण आणि पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
श्रेयस तायडे (१९, रा. आठवडी बाजार, दर्यापूर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचे आरोपी श्रेयस याच्यासोबत वर्षभरापुर्वी प्रेमसंबंध होते. ते मुलीच्या कुटुंबीयांना माहिती झाल्याने तिच्या आईवडिलांनी आरोपीला मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. तेव्हापासून मुलीने प्रेमसंबंध तोडले आणि ती आरोपीसोबत बोलत नव्हती. तरीदेखील आरोपी हा मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्यामुळे ती त्रस्त झाली होती. आरोपीला टाळण्यासाठी तिला अनेकवेळा रस्ता बदलावा लागत होता.
हेही वाचा… उपराजधानी नागपूर राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र
दरम्यान ती महाविद्यालयात पोहचल्यानंतर दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास महाविद्यालयाच्या कँटिनसमोर उभी होती. तेव्हा आरोपी श्रेयस त्या ठिकाणी आला. आरोपीने पीडित मुलीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ती खाली कोसळली. इतर विद्यार्थ्यांनी आरडा-ओरड केल्याने महाविद्यालयातील शिक्षक धावून आले. शिक्षकांनीच तिला रुग्णालयात दाखल केले. ती उपचार घेत असतानाच दर्यापूर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी श्रेयस याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.