चंद्रपूर: आसाम राज्यातून एका युवकाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॉट आयडी वरून आलेल्या फ्रेंडशिपचा स्वीकार केल्याने मूल येथील साक्षी भोयर (१८) हिला समोरच्या व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच लग्नाचे आमीष देवुन ब्लॅकमेल केले व आत्महत्या करण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मूल येथील मुलगी थेट आसाम राज्यात पोहचली. इकडे मुलीच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मूल पोलिस ठाण्यात केली. घटनेचे गांभीर्य ओळखत मूल पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौगुले यांनी मोठ्या शिताफीने हरविलेल्या मुलीला ताब्यात घेऊन वडिलांच्या स्वाधीन केले. मुलींनो सावधान, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका! असे भावनिक आवाहन मूल पोलिसांनी केले आहे.
चंद्रपूर येथील जानकीराम भोयर यांची मुलगी साक्षी भोयर ही मुल येथील कर्मवीर महाविद्यालय मूल येथे बी. ए. प्रथम वर्षाला शिकते. १९ मार्च २०२५ ला महाविद्यालयात जाते म्हणुन ती घरून निघाली. मात्र रात्र होऊनही ती घरी परत न आल्याने पोलिस ठाणे मूल येथे हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीस ठाणे प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधीन उपअधीक्षक प्रमोद चौगुले यांनी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेवुन एक शोध पथक तयार केले. सदर पथकामध्ये पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षा नैताम, पोलिस हवालदार भोजराज मुंडरे, संदिप चौधरी यांचा समावेश करण्यात आला. शोधकार्य दरम्यान सदर मुलीकडे असलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन सायबर सेल कडुन घेण्यात आले. तेव्हा सदर मुलीचे लोकेशन कचर जिल्हा, आसाम राज्य येथे आढळुन आले.
पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशी ठाणेदार प्रमोद चौगुले यांनी चर्चा करून बाहेर राज्यात जाण्याची परवानगी घेवुन आसाम राज्यातील कचर पोलीस अधीक्षक जिल्हा यांच्याशी पत्रव्यवहार केला. शोध पथकाला तात्काळ आसाम राज्यात रावाना केले. यादरम्यान आसाम पोलीसांना मुलीचे लोकेशन व फोटो पाठवुन तिला ताब्यात घेण्याबाबत कळविले. शोध पथक दोन दिवसांनी आसाम राज्य येथील कचर जिल्हा येथे पोहचुन आसाम राज्याचे कचर येथील पोलीस अधीक्षक माहत्ता व अप्पर पोलीस अधीक्षक रंजित पॉल यांना भेटुन त्यांच्या मार्गदर्शनात उदरबर्बोड पोलीस स्टेशनचे प्रभारी सी-इंम-सिम्स तिमुंग यांच्या मदतीने साक्षी भोयर हिला ताब्यात घेण्यात आले. मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या पाल्याना इंन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॉट आयडी वरून ओलल्या अनोळखी फेंन्डशिप स्वीकार करू नये याबाबत समजुन सांगणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध पत्रकाव्दारे मूल पोलिसांनी केले आहे.