नागपूर : बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला मावशीने झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने देहव्यापाराच्या दलदलीत ओढले. प्रियकर व दलालाच्या माध्यमातून तिला हॉटेलमध्ये थांबलेल्या आंबटशौकीन ग्राहकाच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मुलीला देहव्यापार करताना ताब्यात घेतले. मुलीच्या मावशीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडधामन्यातील हॉटेलमध्ये करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १८ वर्षीय मुलगी स्मिता (काल्पनिक नाव) ही मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील असून ती मावशी महिमा हिच्याकडे राहून शिक्षण घेते. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी मावशीने तिला काही दिवस देहव्यापार करण्याचा सल्ला दिला. मात्र, स्मिताने देहविक्री करण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षण बंद करून परत गावी पाठविण्याची धमकी दिली. भीतीमुळे स्मिता देहव्यापार करण्यास तयार झाली.
शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी मुलीने देहव्यापार करण्यास होकार दिला. मुलीची मावशी महिमा हिचे सेक्स रॅकेटमधील दलाल शिवा लोधिया (रा. कळमना) याच्याशी प्रेमसंबंध होते. महिमा आणि शिवा यांनी स्मिताला देहव्यापारात ओढले. वडधामन्यातील हॉटेल मॉं. अन्नपूर्णा येथे रुम बुक केली. स्मिताला आंबटशौकीन ग्राहकाकडे पाठवून मोठी रक्कम कमवायला सुरुवात केली. हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना मिळाली. त्यांनी एसएसबी पथकाला छापा घालण्याचे आदेश दिले.
मंगळवारी पोलिसांनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला. तेथे उपस्थित आरोपी दलाल अमोल ढेरे याला तरुणीची मागणी केली. त्याने लगेच शिवाला फोन करून स्मिताला ग्राहक आल्याचे सांगून हॉटेलमध्ये आणण्यास सांगितले. मावशी महिमाने स्मिताला हॉटेलसमोर सोडले आणि निघून गेली. शिवा आणि अमोल या दोघांनी तिली रुममध्ये ग्राहकाकडे पोहोचवले. बाहेर सापळा रचून बसलेल्या पोलिसांना इशारा देताच हॉटेलमध्ये छापा घालण्यात आला. स्मिताची सुटका करण्याता आली तर शिवा आणि अमोल या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी हिंंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेली मावशी महिमा हिचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा – वर्धा : चारशे किलो गांजा जाळला, अमली पदार्थ विरोधी दिनी पोलिसांकडून जनजागृती
हिंगणा पोलिसांचे लागेबांधे?
संगम रोडवरील मॉं. अन्नपूर्णा हॉटेलमध्ये सुरु असलेल्या शिवा आणि अमोलच्या सेक्स रँकेटशी हिंगणा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई होत नव्हती. तसेच हिंगणा हद्दीतील काही ढाब्यावर आणि फार्म हाऊसवरही देहव्यवसाय पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.