रेल्वेत अधिकारी असलेल्या युवकाने फेसबुकवरून ओळख झालेल्या तरूणीवर बलात्कार केला. या प्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आशिष गोपीचंद बागडे (२६, वायगाव-रामटेक) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष बागडे हा राजस्थानमध्ये कार्यरत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्याची फेसबुकवरून २५ वर्षीय तरूणीशी ओळख झाली. त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी मैत्री केली. दोन ते तीन महिने ते फेसबुकवरून बोलत होते. ती तरूणी एका अगरबत्ती बनविणाऱ्या कंपनीत नोकरीवर आहे. फेब्रुवारीमध्ये दोघांनी नागपुरात भेट घेतली. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
एप्रिलमध्ये आशिष आपल्या वडिलांसह थेट तरूणीच्या घरी आला. त्याने तिच्या आईवडिलांशी लग्नाची बोलणी केली व नातेवाईंकाच्या उपस्थितीत साक्षगंध आटोपले. त्यानंतर तो तरूणीच्या घरी आला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने लग्नाला वेळ असल्याचे सांगून टाळाटाळ केली. तरीही आशिषने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तिने आईशी चर्चा केली. मात्र, लग्न करणार असल्यामुळे आईने तिची समजूत घातली. काही दिवसांनी तो पुन्हा घरी आला. त्याने पुन्हा तरूणीवर लैंगिक अत्याचार केला आणि मोबाईलमध्ये तिचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर तो छायाचित्र दाखवून वारंवार अत्याचार करीत होता.
तरूणीच्या आईने लग्नाची घाई केली असता त्याने लग्नास नकार दिला. पोलिसात तक्रार दिल्यास अश्लील छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. तरूणीने कपिलनगर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.