वर्धा : आरोपी राजेंद्र रामराव झाडे याचे किराणा दुकान आहे. घटनेच्या दिवशी अकरा वर्षीय चिमुरडी आपल्या मैत्रिणीसोबत आरोपीच्या दुकानात पेप्सी व खाऊ आणण्यास गेली होती. त्यावेळी आरोपीने त्या दोघींना दुकानाच्या आत नेले. मी तुम्हाला खाऊ फुकटात देतो. कुणाला सांगू नका,असे आमिष देत लैंगिक चाळे सुरू केले.
हा सर्व प्रकार मुलीने घरी गेल्यावर आईला सांगितला. विशेष म्हणजे, सदर बालिका आठ दिवसांपूर्वी याच दुकानात खाऊ आणण्यास गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी तिच्या आईबाबत घाणेरडा संवाद साधला होता. ही बाबसुद्धा बालिकेने तिच्या आईला सांगितली होती. आईने ही बाब आरोपीच्या पत्नीस सांगितली. मात्र पोलीस तक्रार केली नव्हती. पण आरोपीची वाढती हिम्मत पाहून दुसरी घटना घडल्यानंतर शेवटी आईने हिंगणघाट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेतील गांभीर्य पाहून आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या.