नागपूर : मुंबईतील डब्बेवाले अतिशय काटेकोर नियोजन करून मुंबईतील चाकरमान्याच्या दुपारच्या जेवणाचे डबे अगदी न चुकता पोहोचवण्याचे काम करतात. त्यांच्या या व्यवस्थापनाच्या कौशल्याचे जगभर कौतुक देखील झाले, पण त्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांच्या पाल्याच्या शिक्षण, प्रशिक्षणाची स्थिती जगासमोर आलेली नाही. यातील वास्तव जाणून नागपुरातील लाईफ स्किल्स फाऊंडेशनने मुंबई डब्बेवाल्यांच्या पाल्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देऊन देशाच्या संरक्षण क्षेत्रात पदार्पण करण्यास सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
मुंबई डब्बेवाले १९८० पासून मुंबईतील नोकरदारवर्गाला दुपारच्या जेवणाचे डबे पोहोचवण्याचे कार्य अविरित करीत आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत डब्बेवाले अशाप्रकारे देशसेवा करीत आहे. त्यांच्या कार्याची जगभर दखल घेण्यात आली. या डब्बेवाल्यांच्या कार्याचे कौतुक इंग्लंडच्या प्रिन्स चार्लन्स यांनी देखील केले. ही एक बाजू आहे. पण डब्बेवाल्यांचे मासिक वेतन १५ ते २० हजारांच्या वर नाही. म्हणून हे डब्बेवाले सायंकाळी पाचनंतर रिक्षा चालवण्याचे किंवा इतर कामेदेखील करतात. त्यांच्या उत्पन्नात ते मुलांचे शिक्षण नीट पूर्ण करू शकत नाही. ही वास्तविकता आहे. हे बघून लाईफ स्किल्स फाऊंडेशनने गेल्यावर्षी मुंबई डब्बेवाल्यांशी संपर्क साधला. त्यांच्या संघटनेतील सहा पदाधिकारी आज नागपुरात आले आणि त्यांनी फाऊंडेशनबद्दल माहिती घेतली. नागपुरातील ही फाऊंडेशन दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गरीब, होतकरू मुलांना प्रशिक्षण देऊन संरक्षण खात्यातील विविध पदांसाठी परीक्षा देण्यास प्रोत्साहन देते. संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचा टक्का वाढवा यासाठी फाऊंडेशन कार्य करीत आहे.
हेही वाचा – सरकारने आरक्षण दिले, आता जरांगेंनी अट्टहास सोडावा – देवेंद्र फडणवीस
लाईफ स्किल्स फाऊंडेशन नियोजन, गुणवत्ता नियंत्रण आणि गुणवत्ता सुधारणेसाठी ओळखली जाणारी संस्था आहे. लाईफ स्किल्स फाऊंडेशन ही युवा सक्षमीकरणासाठी समर्पित संस्था आहे आणि त्यांना संरक्षण दलात करिअर करण्यास प्रेरित करते. ही संस्था मुंबई डब्बेवाल्यांच्या मुलांना शिक्षण शुल्कातून सूट देऊन मदत करण्यास पुढे आली आहे. जेणेकरून तरुणांना लष्करी आणि निमलष्करी दलांचा एक भाग बनवता येईल.
हेही वाचा – महाविकास आघाडीत काय सुरू आहे माहिती नाही…. प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले !
मुंबई डब्बेवाला संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी लाईफ स्किल्स फाऊंडेशन, फेटरी, नागपूरला भेट दिली. फाऊंडेशनच्या कार्याची माहिती घेतली आणि मुंबईत येऊन डब्बेवाल्याची भेट घेण्याचे निमंत्रण दिले. युवकांना राष्ट्रसेवेसाठी तयार करण्यासाठी या दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत, असे लाईफ स्किल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजेश्वरी वानखडे यांनी सांगितले.