यवतमाळ : शुक्रवारी रात्रीपासून आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळल्यात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर पुराचे पाणी असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहे. महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शासनाकडे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. पुरामुळे आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ११७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मध्यरात्री २ वाजतानंतर अक्षरश: आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळल्याने पहाटे ४, ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली. यवतमाळ शहरात अनेक सखल भागात रस्ते व अनेक वस्यााऊ पाण्याखाली गेल्या. यवतमाळ नजीक वाघाडी वस्तीत पहाटे ३ वाजताच्या सुमारास पाणी शिरायला सुरूवात झाली. ४ वाजेपर्यंत या वस्तीतील वाघाडी नदीकाठावरील ५० ते ६० घरे पाण्याखाली गेले. यावेळी नागरिकांनी घरावर, झाडांवर मिळेल तेथे आडोसा घेऊन जीव वाचविला.
हेही वाचा >>>विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस; भंडारा, गोंदियात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू, २७ जखमी
सकाळपर्यंत प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. पुराच्या पाण्यामुळे घर कोसळल्याने या वस्तीतील शालू रवींद्र कांबळे (३५) या महिलेचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला. तिचा पती व दोन मुली घराबाहेर पडल्याने ते बचावले. बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे एका पुरूषाचा पुरामुळे घर पडल्याने दबून मृत्यू झाला. यवतमाळातील भारत नगरमधील शशिकांत दुदुलवार यांच्या घराची भिंत कोसळल्याने पाण्याचा लोंढा घरात शिरून नुकसान झाले. उज्वल नगर, दर्डानगरकडून वाहत आलेले पाणी त्यांच्या घरातून भारतनगरमध्ये शिरले. त्यामुळे या भागातील नागरिकांची घरे पाण्यात होती.
आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे शेतात काम करणारे वृद्ध दाम्पत्य पुराच्या पाण्यात अडकले आहे. त्यांच्या बचावासाठी एसडीआरएफचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे पैनगंगा आणि पूस नदीच्या संगमानजीक आनंदवाडी येथे नागरिक पुरात अडकलेले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी शासनाकडे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली असून लवकरच हवाई बचावकार्य सुरू होईल, असे जिल्हाधिकारी येडगे म्हणाले. महागाव तालुक्यातील धनोडा, खडका आणि पेढी येथेही नागरिक पुरात अडकले होते. त्यांना रेस्यूसन करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
हेही वाचा >>>यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शनिवारी सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
यवतमाळ, बाभूळगाव, आर्णी, घाटंजी, कळंब, राळेगाव, महागाव, उमरखेड, पुसद, दिग्रस,दारव्हा, नेर, वणी, झरी, केळापूर, मारेगाव या सर्व तालुक्यात पूरस्थितीमुळे शेतीसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर जमीन पुरामुळे खरडून गेली आहे. जिल्ह्यतील पैनगंगा, अरूणावती, चक्रवर्ती, अडाण, पूस, बेंबळा, वर्धा, वाघाडीसह लहान, मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. यवतमाळ नजीक जाम रोडवर नाल्यावरील फॉरेस्ट गार्डनची भिंत कोसळल्याने हा रस्ता उखडला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकंत्री संजय राठोड यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेवून नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
घरातील सर्व साहित्य पाण्यात
यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात पुराचा फटका बसला. यवतमाळमध्ये सखल भागातील बहुसंख्य घरात पाणी शिरल्याने सर्व साहित्य वाहून गेले. नागरिकांच्या जवेणाचीही भ्रांत आहे. वाघाडी येथे काहीही शिल्लक राहिले नाही. घरातील वस्तुंसह, महत्वाची कागदपत्रंही पाण्यात वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या भोजनासाठी शहरातील सामाजिक संघटनांना आवाहन केले.
हेही वाचा >>>मणिपूर घटनेचे पडसाद सुरूच… ‘आझाद हिंद’चा रास्तारोको!
नगर परिषदेवर रोष
यवतमाळला कधीच पुराचा धोका नाही, हा भ्रम निसर्गाने आज खोटा ठरविला. शहरातील अनेक बेसमेंटची दुकाने पूर्ण पाण्याखाली गेल्याने व्यवसायिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. नगर परिषदेच्या वेळकाढू धोरणाचा फटका आज नागरिकांना सहन करावा लागला. गटारे, नाल्यांची सफाई न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाबाबत शहरात कमालीचा रोष व्यक्त होत आहे.