अकोला : सामाजिक दिवाळी भेट उपक्रमांतर्गत मेळघाटातील चार गावांमध्ये शहरातील निलेश देव मित्र मंडळाच्यावतीने गोरगरिब, गरजूंना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. या चार गावांमधील गरजूंच्या चेहर्यावर दिवाळीच्या आनंदात हास्य फुलले होते.अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पद्वारा संचालित निलेश देव मित्र मंडळाने जुने कपडे संकलन शिबीर आयोजित केले होते. यामध्ये प्राप्त झालेले कपडे शनिवारी मेळघाटातील अढाव, पोपटखेड, शहानुर आणि भिमकुंड या चार गावांमधील गोरगरिबांना मोफत वाटप केले. अकोलेकरांकडून त्यांच्याकडील जुने, परंतु चांगले वापरण्या योग्य कपडे जमा केले होते. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथून देखील कपडे प्राप्त झाले. तब्बल दोन ट्रक भरून कपडे गोळा झाले. इतर कपडे व वस्तू मेळघाटातील चार गावांमध्ये गरजू नागरिकांना वितरण केले.
या उपक्रमासाठी शहरातील सातव चौकातून दोन वाहनांसह संकल्प रथ रवाना झाला. यावेळी प्रा.अंजली आंबेडकर यांनी झेंडी दाखवली. लायन्स क्लब ऑफ मीडटाऊन गोल्डच्या अध्यक्ष अनिता उपाध्याय, कैलास बिचकुडे, डॉ. अशोक ओळबे, लिनेस नम्रता अग्रवाल, सामर्थ्य फाउंडेशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. चिखलदरा तालुक्यातील अढाव गावात प्रत्येकाला कपडे, फराळ, फटाके, चपला जोड वाटप केले. यावेळी अढाव गावच्या सरपंच जसमाय मावसकार व पोलीस पाटील राजाराम मावसकार यांची उपस्थिती होती. निलेश देव, जयंत सरदेशपांडे, रामहरी डांगे, मिलिंद देव, मंगेश देशमुख, राजु गुन्नलवार, श्रीराम उमरेकर, निलेश पवार, अजय शास्त्री, मंगेश देशमुख, विजय वाघ, सोनू मोटे, रविंद्र मेश्राम, गणेश मैराळ, भास्कर बैतवार, नरेंद्र परदेसी, रमेश खिलोसिया, आशु यादव, शशि हिवरखेडकर, प्रसाद देशपांडे, हरिशचंद्र राठोड, अंकुश तिरपुडे आदींनी उपक्रमात सहभाग घेतला.
हेही वाचा >>>नागपूर: लक्ष्मीच्या मूर्तीसह पूजेसाठी ठेवलेले दहा लाखांचे दागिने चोरी
कर्करोग रुग्णालयात अन्नदान
माजी नगरसेविका अॅड. धनश्री देव यांच्या स्मृतीनिमित्त संत तुकाराम कर्करोग रुग्णालयात सर्व रुग्ण व नातेवाईकांसाठी अन्नदान करून गरिब रुग्णांना शाल, साडी, ब्लँकेटचे वाटप केले. महिलांना नव्या साड्यांचे देखील वाटप केले. या उपक्रमात रामकृष्ण देव, दिलीप देशपांडे, प्रकाश जोशी, रश्मि देव, शैलेश देव, आशिष तिवारी, राजू कनोजिया, लल्लन मिश्रा आदी सहभागी झाले.