गोंदिया: तालुक्यातील रावणवाडी येथील रहिवासी दाम्पत्यातील कौटुंबिक वादाचा थरारक अंत झाला. हे दाम्पत्य रोजगाराच्या शोधात नागपूरला गेले होते. तेथे पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या समृद्धी महामार्गाजवळील जंगलात फेकून दिला होता. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हिंगणा पोलिसांनी सोमवारी रावणवाडीतून आरोपीला अटक केली.
देवराम पटले (४५, रा. रावणवाडी, गोंदिया, ह.मु. हिंगणा- नागपूर), असे आरोपी पतीचे तर सायत्रा देवराम पटले (४२), असे मृत पत्नीचे नाव आहे. देवरामने १४ नोव्हेंबर रोजी पत्नी सायत्राची हत्या करून तिचा मृतदेह समृद्धी महामार्गाजवळील जंगलात फेकून दिला होता. यानंतर १४ नोव्हेंबरला देवरामने सायत्रा बेपत्ता झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. याबाबत देवरामने नागपूर पोलिसांत पत्नी हरवल्याची तक्रारही दाखल केली.
हेही वाचा… बडनेरा-नाशिक दिवाळी विशेष मेमू नोव्हेंबर अखेरपर्यंत धावणार; प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे…
तक्रार दाखल झाल्यानंतर हिंगणा पोलिसांना अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासाअंती तो मृतदेह सायत्रा पटलेचा असल्याचे समोर आले. हिंगणा पोलिसांनी तपासाची तपासाची व्याप्ती वाढवली. तपासाअंती देवरामने एका सहका-याच्या मदतीने पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले. हिंगणा पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी रावणवाडीतून देवरामला अटक केली. देवरामला एक मुलगा व एक मुलगी असून ते रावणवाडी येथे नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत आहेत.