नागपूर: वस्तीतील एका युवकाशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करीत खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नंदनवनमध्ये घडली. अर्चना भारस्कर (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर रमेश मोतीराम भारस्कर (४८) असे आरोपीचे नाव आहे.
रमेश आणि अर्चना यांना पुष्पा (१०) आणि त्रिशा (५) दोन मुली असून ते रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली क्र.१२ येथे राहतात. रमेश यांना दारुचे व्यसन आहे. पत्नी अर्चनाचे वस्तीतील एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय रमेश याला होता. त्यावरून पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. अर्चनाने केवळ वस्तीतील ओळखी असल्यामुळे बोलत असल्याचे सांगत होती.
हेही वाचा… यवतमाळ : मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी धरणे आंदोलन
मात्र, तो नेहमी पत्नीला मारहाण करीत होता. त्यामुळे कंटाळून ती गेल्या ६ वर्षांपूर्वी माहेरी अमरावती शहरात निघून गेली. काही महिन्यांपूर्वी रमेश याची प्रकृती खराब झाली. त्यामुळे नातेवाईकांनी अर्चनाची मनधरणी केली आणि परत बोलावले. पतीच्या आजारपणात तिने साथ देत उपचार केला. रमेश गेल्या आठवड्यापासून अर्चनाला खूप मारहाण करीत होता. त्यामुळे सोमवारी ११ वाजेपर्यंत ती दोन्ही मुलींसह दिराकडे होती.
हेही वाचा… संपूर्ण चंद्रपूर जलमय; अनेक वस्त्या पाण्याखाली, हजारो घरात पावसाचे पाणी शिरले
पुष्पाला दिराकडे साेडून अर्चना त्रिशाला घेऊन रात्री परत आली. मध्यरात्रीच्या सुमारास रमेशने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करीत खून केला. रात्रभर मृतदेहाजवळ झोपला आणि सकाळी घराला कुलूप लावून निघून गेला. सकाळी ही घटना उघडकीस आली. नंदनवनचे ठाणेदार विजय नाईकवाड यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.