नागपूर : घरात पाणी भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजता शंभूनगरात उघडकीस आली. मुकुल कुमारी सिन्हा (६३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर पुरुषोत्तम कुमार सिंह (६५) असे आरोपीचे नाव आहे. मुकुल कुमारी या केंद्रीय विद्यालयात शिक्षिका होत्या तर पती पुरुषोत्तम कुमार हा केंद्र शासनाच्या सीएमपीडीआय विभागात मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.
लग्न झाल्यापासूनच दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. मुकुल कुमारी यांचे शाळेच्या मुख्याध्यापकासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप पुरुषोत्तम घेत होते. त्यामुळे वाद होऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, काही वर्षानंतर ते पुन्हा एकत्र आले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते सर्व नोकरीवर आहेत. हे दोघे पती-पत्नी शंभूनगरात राहत होते. रविवारी सकाळी पत्नीने पाणी भरण्यास सांगितल्यामुळे पतीला राग आला. त्यावरून दोघांत वाद झाला. पती पुरुषोत्तम याने घरातून कुऱ्हाड आणली आणि पत्नीच्या डोक्यात घातली. पत्नीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.