नागपूर : शाळाबाह्य मुलांचे विश्व एकदम वेगळे. एक तर ते कुठेतरी मोलमजुरी करतील, नाही तर वाईट मार्गाला लागतील. त्यातही त्या मुली असतील, तर लग्न करून त्यांना सासरी पाठवले जाईल. मात्र, या आदिवासी मुली शिक्षणाच्या मूळ प्रवाहात नसल्या तरी क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी खूप मोठी आहे. आदिवासी मुलींचा देशातील सर्वात पहिला क्रिकेट संघ मैदान गाजवत आहे. या सगळ्या मुली १४ वर्षाच्या आतील, पण आदिवासी समाजात मुली कधीच मागे नसतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिवासी समाजातून आलेल्या मुलींसाठी हे विश्व वेगळे आहे, नवीन आहे, पण तरीही त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे. शिक्षणापासून दूर गेल्यानंतर या मुलींचा क्रिकेट संघ हा कौतुकाचा विषय ठरत आहे. नागपूर शहराच्या एका टोकाला सिद्धेश्वर ही वस्ती आहे. या वस्तीमध्ये सुमारे दोन हजार लोक राहतात. या वस्तीमधील काही मुलेमुली कचरा वेचतत्. अशा सिद्धेश्वर वस्तीत राहणाऱ्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाची सोयदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे वस्तीतील मुलेच नाही तर मुलीदेखील व्यसनांच्या आहारी जाऊ लागले. ही अत्यंत भयावह परिस्थिती समाजसेवक खुशाल ढोक यांना दिसून आली. त्यांनी या सर्व मुलींच्या जीवनाला आकार देण्याचा निश्चय केला. सुरुवातीला या मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व मुलींचा खेळण्यात अधिक कल दिसून आला. त्यामुळे ढोक यांनी अनेक प्रकारचे खेळ मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र, सर्व मुलींना क्रिकेटमध्ये जास्त रुची जास्त होती. त्यामुळे त्यांनी मुलींना क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे साधारपणे एक ते दीड वर्षांपूर्वी या मुलींचा नवा प्रवास सुरू झाला. आज या मुली व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्याकडे जन्मदाखल्यासारखी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे आदिवासी समाजातील मुली कधीही शाळेत गेल्या नाहीत. त्यामुळे खुशाल ढोक यांच्या सेवा सर्वदाय संस्थेने या सर्व मुलींसाठी रात्रीची शाळा सुरू केली. यापैकी अनेक मुली या जपानी भाषादेखील बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळी उठल्यापासून अंधार पडेपर्यंत मुली मैदानात क्रिकेटचा नेटमध्ये सराव करत असतात. यापैकी कुणी बॅटिंग तर कुणी बॉलिंगमध्ये तरबेज आहे. मध्यंतरीच्या काळात या मुलींनी काही क्रिकेट सामनेदेखील जिंकले त्यावेळी विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडूनही या मुलींचे कौतुक करण्यात आले. या संघातील सर्व खेळाडू या आदिवासी समाजामधून येत असल्यानं त्याची शरीरयष्टी मजबूत आहे. त्या कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करतात. त्यांच्यात असलेली उर्जा, जिद्द, चिकाटी आणि निडरपणा त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते. आदिवासी मुली इतर मुलींच्या तुलनेत अधिक बलवान आहेत. त्याचाच फायदा क्रीडा क्षेत्राला होऊ शकतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A inspiring story of out of school tribal girls who playing good cricket rgc 76 asj