बुलढाणा : समृद्धी महामार्गावर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातानंतर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत काही त्रुटींकडे लक्ष वेधले. तसेच उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
राज्य रस्ते विकास महामंडळचे उपविभागीय व्यवस्थापक हिमांशू पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे, संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार या पाहणीत सहभागी झाले. जिल्ह्यातील ४ तालुक्यांतून जाणाऱ्या ८७ किलोमीटर अंतराच्या समृद्धी मार्गाची पोलीस अधीक्षकांनी बारकाईने पाहणी केली.
हेही वाचा – फडणवीसांबाबत कलंक हा शब्द प्रयोग योग्यच, कॉंग्रेस नेते अतुल लोंढे स्पष्टच बोलले
सुनील कडासने यांनी नागपूर व मुंबई या दोन्ही मार्गाने ज्या ठिकाणी वाहने जिल्ह्यात प्रवेश करतात त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्याचे निर्देश दिले. या दोन्ही ठिकाणी पोलिसांची राहुटी लावण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना या पोलिसांनी ‘अलर्ट’ करणे अपेक्षित आहे. तसेच जिल्ह्यातील दुसरबीड, मेहकर व सिंदखेड राजा या तीन ‘इंटरचेंज’वर चालकांचे समुपदेशन करण्यात यावे. तसेच पुलाच्या ठिकाणी ‘क्रॅश बॅरिअर’ लावण्याची उपयुक्त सूचना कडासने यांनी केली. या उपाय योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशच त्यांनी यावेळी दिले.