यवतमाळ: रात्रगस्तीवर असलेले कळंब पोलीस ठाण्याचे वाहन करळगाव घाटातील दरीत कोसळले. रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचा वाहनवरील ताबा सुटून ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे या पोलीस कर्मचारी, होमगार्डसह रात्री उशिरा गस्तीवर निघाल्या. बाभूळगाव येथून यवतमाळकडे करळगाव घाटात एक रानडुक्कर अचानक वाहनाच्या समोर आले. त्याचवेळी मागाहून दुसरे वाहन येत असल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटून वाहन थेट लगतच्या दरीत कोसळले व पलटी झाले.

हेही वाचा… मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भातील प्रवाशांना दिलासा; ‘या’ द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेच्या २२ फेऱ्या

ठाणेदार भेंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाहनातून सुटका करून घेत सर्वजण बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात हलविले. या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A kalamb police station vehicle on night patrol fell into valley in karlgaon ghat yavatmal as driver lost control due to a wild boar nrp 78 dvr