नागपूर : बिबट्याचे एवढेसे पिल्लू आईपासून दुरावले आणि एका पडक्या घरात त्याने आश्रय घेतला. त्याची नजर मात्र आईला शोधत होती, पण बाहेरची माणसांची गर्दी त्याला बाहेर आईचा शोध घेण्यापासून थांबवत होती. शेवटी हे पिल्लू गावकऱ्यांना दिसले आणि त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. तब्बल २४ तासानंतर त्या पिल्लाला त्याची आई मिळवून देण्यात वनविभाग आणि ट्रान्झित केंद्राच्या चमुला यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काटोल तालुक्यातील मौजा खापरी (केने) या गावाच्या शिवारात शेतातील एका पडक्या घरामध्ये बिबट्याचे एक पिल्लू असल्याबाबतची माहिती वनविभागास मिळाली. काटोल वनपरिक्षेत्राधिकारी नरखेडकर, वनरक्षक चाटे व इतर वनकर्मचारी हे तात्काळ घटनास्थळ पोहचले व गावकऱ्यांची तिथे गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली. तसेच या घटनेबाबतची माहिती सेमीनरी हिल्सवरील ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राला देण्यात आली. ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमूने घटनास्थळी तात्काळ भेट दिली. बिबटच्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी करून पुढील वैद्यकीय उपचाराकरिता ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्रात घेऊन गेले. वनविभागातर्फे कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले व गावांकऱ्यांची बैठक घेऊन गावकऱ्यांना, तसेच शेतकऱ्यांना सदर ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करण्यात आले व अनुचित प्रकार टळण्यासाठी रात्रभर गस्त करण्यात आली. काटोल वनविभाग व ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमुने बिबट्याच्या पिल्लाच्या आईसोबत पुनर्मिलांनाकरिता त्याच ठिकाणी पिल्लू ठेवले व कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. सदरच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्यात आली. त्यामुळे सायंकाळी ६ वाजून ४७ मिनीटांनी मादी बिबट पिलाजवळ आली आणि सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पिलाला उचलून जंगलाच्या दिशेने घेऊन गेली. अशाप्रकारे बिबटच्या पिल्लाचे पुनर्मिलन काटोल वनविभाग व ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्र यांच्या सांघिक नियोजनामुळे व उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे यशस्वी झाले.

नागपूर वनवृत्ताचे वनसंरक्षक व उपवनसंरक्षक तसेच सहाय्यक वनसंरक्षक पांडुरंग पाखले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वी करण्यात आली. यावेळी राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनीत अरोरा, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. प्रियल चौरागडे, आदींनी ही कामगिरी पार पाडली.