शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे नागरिकांना आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले असून त्यांना वडाळी येथील वन उद्यानात ठेवण्यात आले आहे.महादेव खोरी परिसर यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. येथूनच जवळ वनविभागाने वनीकरण केले आहे.
पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग मानला जातो. गुरुवारी सकाळी काही जणांना या परिसरात बिबट्याचे दोन बछडे दिसून आले. त्यांनी लगेच फ्रेझरपुरा पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची सूचना वनविभागाला दिली. लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट मादी पळून गेली. वनविभागाच्या पथकाने या बछड्यांना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यांना वडाळी येथील उद्यानात हलवण्यात आले आहे. या बछड्यांना त्यांच्या जन्मदात्रीकडे परत सोडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे वनविभागातील सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : अमरावती : …तर कृषी धोरणातही बदल करणार; कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची मेळघाटात ग्वाही
बिबट्याचे दोन बछडे पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीला आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर पोलिसांच्या सहकार्याने वनविभागाच्या पथकाने या बछड्यांना तेथून सुरक्षितरित्या बाहेर काढले. या बिबट्याचे वय सहा ते सात महिने इतके आहे.
बछड्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळावा, यासाठी त्यांना पुन्हा जंगलात आईकडे सोडण्याचे प्रयत्न करायला हवेत. या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून बिबट मादीचा शोध घेतला जावा, अशी अपेक्षा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी व्यक्त केली आहे. महादेव खोरी परिसरातील एका ‘फार्म हाऊस’वर गेल्यावर्षी बिबट्या आढळून आला होता. कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न त्याने केला होता.