अमरावती शहरातही आता बिबट्यांनी शहरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात दिसणाऱ्या बिबट्याने आता शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेपर्यंत मजल मारली आहे. बुधवारी सकाळी या परिसरात बिबट्याने शिरकाव केला आणि त्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वनखात्याच्या वाहनावर उडी घेतली.
बिबट्यांच्या धुमाकूळ आता गोरेगाव, आरे कॉलनी, नाशिक शहरापुरता मर्यादित राहिला नाही. तर नागपूर, अमरावती शहरातही भरदिवसा बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. नागपूर शहरात गेल्या तीन ते चार वर्षात अनेकदा अंबाझरी लगतच्या भागात बिबट दिसून आला. तर आता गेल्या वर्षभरपासून अमरावती शहरातही त्याने धुमाकूळ घातला आहे. याआधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, पोहरा-मालखेड परिसरात तो अनेकदा येऊन गेला. काही स्वयंसेवींनी अनेकदा रात्री याठिकाणी वनखात्याच्या चमूला घेऊन गस्तही केली. मात्र, त्यानंतर खात्याची उदासिनता दिसून आली. आज, बुधवारी सकाळी पुन्हा शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या परिसरात बिबट शिरला आणि क्षणार्धात याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. गर्दीला पांगवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने बिबट्याच्या मागे लोक पळत गेले. वनखात्याची चमू बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आली, पण जमावाला आवर घालण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे बिबटही सैरभैर पळू लागला. यावेळी बिबट्याने थेट वनखात्याच्या वाहनावरच झेप घेतली. हजारोंच्या संख्येने येथे नागरिक जमा झाले होते आणि त्यावेळी बिबट्याने जमावावर हल्ला केला असता तर मोठे आक्रीतही घडले असते.