बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील प्राणी खरेच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न हे प्राणिसंग्रहालय सुरू झाल्यापासून सातत्याने उपस्थित होत आहे. प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांपूर्वी ‘डॉली’ नामक मादी बिबट मृत्यूच्या दाढेतून बचावली. त्यामुळे, अनुसूची एकमध्ये येणाऱ्या प्राण्यांबाबत व्यवस्थापनाच्या गांभीर्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात भारतीय सफारीअंतर्गत वाघ सफारी, बिबट सफारी, तृणभक्षी प्राण्यांची सफारी आणि अस्वल सफारी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या प्रत्येक सफारीला स्वयंचलित प्रवेशद्वार आहेत. सफारी कक्षातून पर्यटक वाहन बाहेर पडल्यानंतर हे प्रवेशद्वार आपोआप बंद होते.रविवारी दुपारी चार वाजताच्या सफारीदरम्यान पर्यटक वाहन बिबट सफारीतून अस्वल सफारीसाठी जात असताना स्वयंचलित प्रवेशद्वारात अडकले. त्याला धक्का बसला आणि ते जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी पर्यटकाने सांगितले. प्रवेशद्वाराच्या सेन्सॉरमध्ये बिघाड झाल्याने ही घटना घडली.
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
मात्र, त्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे अभिरक्षक दीपक सावंत यांनी रिमोटने ते प्रवेशद्वार हाताळण्याचा प्रयत्न केला, पण बिबट त्यात आणखी अडकले. जखमी बिबट्याच्या खांद्याला आणि पाठीला जबर मार बसल्याचे प्रत्यक्षदर्शी पर्यटकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारपासून ‘डॉली’ नामक बिबट्याने काहीही खाल्ले नव्हते आणि रविवारी ही घटना घडली.त्यानंतर आता गुरुवारी ती दिसून आल्याने ती सुरक्षित असल्याचे गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत यांनी सांगितले. मात्र, रात्रीपर्यंत पिंजऱ्यात न आल्याने ती सुरक्षित असल्याचे कशावरुन असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना दररोज खायला घालणे ही प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मात्र, जखमी बिबट्याने गेल्या आठ दिवसांपासून काही खाल्लेले नाही. व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी किंबहुना अनुसूची एकमधील वन्यप्राणी जखमी झाल्यास त्याला बेशुद्ध करून त्याची तपासणी करण्यात येते. येथे जखमी बिबट्याला शोधून व त्याला बेशुद्ध करून त्याची आरोग्य तपासणी करण्याचे प्रयत्न देखील झाले नाहीत. याउलट बिबट दिसले आणि ते झाडावर चढले म्हणजे ते ठीकच असणार असा अंदाज गोरेवाडा प्रशासनाने लावला. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी अभिरक्षकाची आहे, पण त्यांनाही हे गांभीर्य नाही का, असा प्रश्न आहे.