नागपूर: पतीच्या मृत्यूनंतर घरात अठराविश्व दारिद्र्य आणि त्यात पाच मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी. मुलांचे शिक्षण आणि खाण्यापिण्याची सोय करताना फुलांचे हार तयार करणाऱ्या महिलेच्या नाकी नऊ आले. त्यात लहान मुलीने आकाशपाळण्यात बसण्याचा हट्ट धरला. त्यासाठी तिने २० रुपयांची आईला मागणी केली. अगतिक झालेल्या मातेने पैसे नसल्याचे सांगताच मुलीने चक्क घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ती तीन दिवस घरातून बेपत्ता होती.
शेवटी एएचटीयू पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि तिच्या आईच्या स्वाधीन केले. ही घटना मोमीनपुऱ्यात घडली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पठाण दाम्पत्य राहत होते. पठाण हे सायकलवर भंगार गोळा करायचे तर पत्नी चार घरची धुणीभांडी करायची. तीन मुली आणि दोन मुलांचा संसार सुरळित सुरु होता. पठाण यांचा आजारपणात मृत्यू झाला.
हेही वाचा… नागपूर : मोबाईलबद्दल पालक रागावले; मुलीने चक्क घरच सोडले
त्यामुळे पत्नीवर पाच मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली. पाचही मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या दोन वेळेसच्या जेवनाची सोय करण्यासाठी महिलेने परडीत फुले आणून फुलांचे हार तयार करून धार्मिक स्थळावर विक्री करण्यास सुरुवात केली. अत्यल्प मिळकतीत कसेबसे दिवस काढत असताना लहान मुलगी हिना (वय १४, बदललेले नाव) हिच्या मैत्रीणी यात्रेतील आकाशपाळण्यात बसायला जात होत्या. त्यामुळे हट्टी हिनाने आईला २० रुपये मागितले.
हेही वाचा… अमरावती : पश्चिम विदर्भात ८ लाख हेक्टरवरील पेरण्या अडचणीत; पावसाची पाठ
मात्र, आईने तिला पैसे नसल्याचे सांगून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईचे माझ्यावर प्रेम नसल्याची भावना निर्माण झाल्याने हिना घरातून निघून गेली. रात्री ९ वाजेपर्यंत मुलगी घरी न आल्याने आई आणि भावंडांनी शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नाही.
हिना बेपत्ता झाल्याने तहसील पोलिसांनी अपहरणाची तक्रार केली. पोलीस उपायुक्त ए. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयू पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ, हवालदार दीपक बिंदाने, मनिष पराये, ऋषिकेश डुमरे, अश्विनी आणि आरती यांनी धार्मिक स्थळावर शोधाशोध केली. बेपत्ता झाल्याच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांना हिना मोठ्या ताजबागमध्ये एकटीच फिरताना दिसून आली. तिला ताब्यात घेतले आणि आईच्या स्वाधीन केले. तीन दिवस मिळेल ते खाऊन ती ताजबागमध्ये अन्य भाविकांसह राहत होती.
आकाशपाळण्यात बसण्याची इच्छासुद्धा पूर्ण न करू शकणाऱ्या आईचे माझ्यावर प्रेम नसल्याचे तिने पोलिसांकडे बोलून दाखवले. तर आईने आपल्या गरिबीमुळे अगतिक असल्याची खंत व्यक्त केली.