नागपूर : शहरातील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजारात सध्या आंब्याची आवक वाढली असताना एका व्यापाराकडे चक्क एक किलो वजनाचा एक आंबा विक्रीला असून या आंब्याची सध्या बाजारात चांगलीच चर्चा असून या त्याची मागणी वाढली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या दिवसांत बाजारात आंब्याला चांगली मागणी असते. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुकेश कुमार-रोशन कुमार अडतिया या आंबा विक्रेत्याकडे आंबा विक्रीला असून या एक किलो आंब्याची सर्वच बाजारपेठांमध्ये चर्चा आहे. आंबा व्यापारी मुकेश कुमार यांनी सांगितले, मांचियालमधील पिरकापल्ली या गावातून हा आंबा विक्रीला आला आहे. मलगोबा, बैगनफल्ली या प्रजातीचे हे आंबे आहेत.
एक आंबा एक ते सव्वा किलो वजनाचा असून या आंब्याला चांगली मागणी असली तरी फारसा भाव मिळत नाही. १५ रुपये किलो प्रमाणे हा विकण्यात आला. हा आंबा आंबट असून भाजी किंवा लोणच्यासाठी या आंब्याचा वापर करतात. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत या एक किलोच्या आंब्याची चर्चा असून अनेकांना हा आंबा बघून आश्चर्याचा धक्का बसत आहे.
हेही वाचा – भंडारा : लग्न सोहळा आटोपून येणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी
अवकाळी पावसामुळे फळगळ झाल्याने शिल्लक राहिलेले हे आंबे आकाराने मोठे झाल्याचे जाणकार सांगत आहेत. सध्या बाजार समितीत एक किलो वजनाच्या आंब्यांची चर्चा सुरू असून हे आंबे पाहून अनेक नागरिक आश्चर्यचकित होत आहेत.