अनिल कांबळे
नागपूर : पहिले प्रेम विसरता येत नाही, असे म्हणतात. पहिल्या प्रेमात कुटुंबाचा विरोध आडवा आल्याने प्रेमविवाह करता आला नाही. त्यामुळे एका युवकाने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. परंतु, लग्नाच्या १५ वर्षांनंतरही त्याला पहिले प्रेम विसरता येत नव्हते. त्याने तिचा शोध घेतला. ती चक्क त्याची वाट बघत अविवाहित होती. त्याने पत्नीला कळू न देता तिच्याशी संसार थाटला. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांचे पितळ उघडे पडले आणि संसार अडचणीत आला. मात्र, भरोसा सेलने दोघांमध्ये समेट घडवून आणला.
सुमित आणि प्रणीता (बदललेले नाव) दोघेही नागपूर जिल्ह्यातील एकाच गावचे. शाळेत असतानाच दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रणीताच्या कुटुंबीयांनी या लग्नास विरोध दर्शवला. प्रणीताने लहान बहिणींचा विचार करीत सुमितला दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. यादरम्यान, तो शासकीय सेवेत वाहनचालक म्हणून लागला. प्रणीताने असमर्थता दर्शवल्यामुळे त्याने नाईलाजास्तव न्यायालयीन काम करणाऱ्या नम्रताशी (काल्पनिक नाव) लग्न केले. दोघांचा संसार नीट सुरू होता. त्यांना एक मुलगा झाला.
हेही वाचा >>> युनिसेक्स सलुनच्या नावावर १६ वर्षीय मुलीकडून देहव्यापार
परंतु, सुमितला पहिले प्रेम विसरता येत नव्हते. त्यामुळे त्याने प्रणीताचा शोध घेण्याचे ठरवले. प्रणीता अजूनही अविवाहित असल्याचे कळले. त्याने तिची भेट घेतली व दोघांच्याही आठवणी जाग्या झाल्या. ‘तुझ्याशी लग्न होऊ न शकल्याने तुझ्या आठवणीत अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला’ असे तिने सांगितले. दोघांनाही गहिवरून आले. भेटी वाढत गेल्या आणि त्याने एकाकी राहणाऱ्या प्रणीताला नागपुरात आणले. ते सोबत राहू लागले त्यांना बाळही झाले.
मोबाईलमुळे उघडकीस आले प्रकरण
एकदा सुमित मोबाईल घरी विसरला आणि नेमका पत्नी नम्रताने तो तपासला. त्यात प्रणीतासोबत फोटो आणि संवाद दिसला. सुमितने प्रणीताशी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याची कबुली दिली. पुन्हा ताटातूट झाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. संभ्रमात पडलेल्या पत्नी नम्रताने भरोसा सेल गाठले. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे आणि समुपदेशक प्रेमलता पाटील यांनी तिघांनाही समोरासमोर बोलावले. एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेण्यास मदत केली. तिघांनीही सामंजस्याने निर्णय घेतल्याने समस्येवर तोडगा निघाला.