बुलढाणा: नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार परिसरात बिबट माता आणि तिच्या पिल्लाची ताटातूट झाली. वियोगामुळे माता कासावीस, अस्वस्थ झाली तर दिडेक महिन्याचे शावक भयभीत झाले होते. दुसरीकडे जवळा बाजार मधील गावकरी आणि शेतकरी भयभीत झाले होते… मात्र वनविभागाने अखेर माता आणि तिच्या लेकराची भेट घडवून आणली. त्यांच्या पुन:भेटीने वनविभाग पथकातील कर्मचाऱ्यांना देखील गहिवरून आले. बिबट मातेने लहानग्या पिल्लाला तोंडात धरून सोबत नेत असताना कर्मचाऱ्यांचे डोळेही पानावले…

बुलढाणा जिल्ह्यातील जवळा बाजार गावा नजिकच्या असलेल्या एका मकाच्या शेतात बिबट्याचा एक ते दिड महिन्याचा शावक आढळून आला होतं. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. आपल्या आई पासून दुरावलेल्या या पिल्लूला आई पुन्हा मिळावी यासाठी वन विभागाने प्रयत्न केले.  अर्ध्या रात्री दोघाची पुनर्भेट झाली  ही भेट परिसरात लावण्यात आलेल्या ‘ट्रॅप कॅमेऱ्या’त कैद झाली आहे.

नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखर्डा ढोकने यांचे गावा जवळ शेत आहे. सुनील ढोकने तीन दिवसापूर्वी  सकाळी  शेतात काही कामानिमित्त गेले होते. यावेळी  त्यांना शेतातील मका पिकात बिबट्याचा , एक ते दिड महिन्याचा शावक दिसून आला होता . मादी बिबट जवळच असेल अशी शंका होती. ही बातमी गावात पसरताच गावकरी आणि इतर शेतकरी भयभीत   झाले.

 यामुळे भयभीत झालेले शेतकरी सुनील ढोकने यांनी तात्काळ मोताळा वनविभागाला याची माहिती दिली. याची गनभीर दखल घेत वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनात वनपाल ए.एन. सपकाळ, वनरक्षक एल.डी. राठोड, चालक वैभव फुंड व काही वन मजूर घटनास्थळी पोहोचले. बिबट्याच्या शावकाला ताब्यात घेऊन परिसरात शोध घेतला. मात्र मादी बिबट् आढळून आली  नाही. यामुळे या पिल्लूला मोताळा येथे आणून त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत हे पिल्लू  सुदृढ असल्याचे सांगण्यात आले. बुलढाणा उप वनसंरक्षक सरोज गवस, सहायक उप वन संरक्षक अश्विनी आपेट यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी बिबट माता व पिल्लुचे मिलन व्हावे यासाठी जवळा बाजार येथील शेतकरी सुनील ढोकणे यांच्या शेतात काल सायंकाळी  पोहोचले.  शावकाला प्लास्टिकच्या कॅरेट मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले तसेच आजूबाजू ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. अधिकारी व कर्मचारी घटनास्थळा पासून  लांब अंतरावर निघून गेले. दरम्यान काल मध्यरात्री

शावकाचा आवाज ऐकून त्याची आई कॅरेट जवळ पोहोचली  आपल्या शावकाला तोंडात धरून निघून गेली. हे क्षण पाहून वनविभाग कर्मचारी देखील भावुक झाले .