नागपूर : वडिलासह कंपनीत कामाला असलेल्या त्यांच्या ४५ वर्षीय मित्रावर दहावीत शिकणाऱ्या मुलीचा जीव जडला. तो वारंवार घरी येत असल्यामुळे त्याच्याशी जवळीक वाढली. त्यानंतर वडिलाच्या मित्रासह तिने पलायन केले. गुन्हे शाखेच्या एएचटीयूने पाच वर्षांनंतर त्या बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेतला. त्यावेळी ती एका बाळाची आई होती. मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. मुलीला पाहताच वडील आणि भावंडाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
पूनम (काल्पनिक नाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलीचे नाव आहे. तिला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वडिल एका सिमेंटचे पाईप बनविणाऱ्या कंपनीत कामाला होते. त्याच कंपनीत आरोपी प्रकाश लोखंडे (४५), रा. मध्यप्रदेश हासुद्धा कामाला होता. दोघेही एकाच कंपनीत असल्याने त्यांची मैत्री होती. प्रकाश नेहमीच त्यांच्या घरी जायचा. तिचे वडील आणि प्रकाश नेहमी घरी पार्टी करायचे. त्यामुळे त्याचा आणि पूनमचा संपर्क वाढला. मात्र, प्रकाशची नजर मित्राची मुलगी पूनमवर गेली. तेव्हा ती केवळ १५ वर्षांची होती. नेहमी घरी जात असल्याने ओळख, बोलचालनंतर त्याने पूनमशी जवळीक साधली. तो तिला महागड्या भेटवस्तू द्यायला लागला. तसेच नेहमी तिला हॉटेलमध्ये घेऊन जायला लागला. त्यामुळे प्रेम या शब्दाचा अर्थही न कळण्याच्या वयात पूनमचा जीव प्रकाशवर जडला. वडिलाचा मित्र आणि आपल्यापेक्षा तिप्पट वय असलेल्या प्रकाशचेही पूनमवर प्रेम जडले. प्रकाशने पूनमला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला पत्नी बनवून सुखी ठेवण्याचे आमिष दाखवले. तीसुद्धा वडिलाच्या मित्राच्या प्रेमात आकंठ बुडाली. तिला भेटण्यासाठी प्रकाश हा चोरून-लपून तिच्या घरी यायला लागला. तिला फिरवायला न्यायला लागला. प्रकाशचे प्रेम बघून पूनमने त्याला पळून जाऊन लग्न करण्याचा तगादा मुलीने लावला.
हेही वाचा – नागपूर : अल्पवयीन पत्नी गर्भवती; पतीवर बलात्काराचा गुन्हा
मध्यप्रदेशात नेले पळवून
२ सप्टेंबर २०१८ ला पूनमने वडिलाच्या मित्रासोबत मध्यप्रदेशात पलायने केले. दोघेही मुलताई शहरात काही महिने राहिले. पूनमने वयाचे १८ वर्षे पूर्ण होताच प्रकाशशी लग्न केले. सध्या तिला आठ महिण्याचे एक बाळ आहे. ती यशोधरानगरात मैत्रिणीला भेटायला येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ती मैत्रिणीला भेटायला येताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर ती एका बाळाची आई असल्याचे समजले. अपहृत मुलगी मिळाल्याची बातमी तिच्या कुटुंबियांना देण्यात आली. आता आरोपी प्रकाशलासुद्धा ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्या मार्गदर्शनात समाधान बजबळकर, मनीष पराये, दीपक बिंदाने, नाना ढोके, ऋषीकेश डुमरे, आरती चव्हाण, अश्विनी खोडपेवार यांनी केली.