यवतमाळ: शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चिमुरडीस शाळेत सोडून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना जिल्ह्यातील उमरखेड उघडकीस आली.
उमरखेड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत जाण्यासाठी तालुक्यातील नवीन पळशी फाट्यावर ही चिमुरडी उभी होती. दुचाकीस्वाराने शाळेत सोडण्याचा बहाणा केला. तिला भावासारखा असल्याची बतावणी करीत दुचाकीवर बसविले. नंतर बेलखेड शिवारात नेवून एका शेतात तिच्यावर अत्याचार केला. ११ वर्षीय पीडित मुलगी इयत्ता पाचवीत शिकत आहे. शाळेच्या गणवेशात मंगळवारी ती सकाळी नवीन पळशी फाट्याजवळ बसची प्रतीक्षा करीत होती. तेवढ्यात तिच्याजवळ एक दुचाकीस्वार आला. त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसायला सांगितले. मात्र, तिने बसण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने ‘माझी मुलगी तुझ्याच शाळेत शिकते’, असे सांगितले. तरीही ती चिमुरडी त्याच्या दुचाकीवर बसण्यास तयार नव्हती. अखेरीस त्याने ‘मी तुझ्या भावासारखा आहे. तू बस घाबरू नको’, असे म्हणत तिला विश्वासात घेतले व तिला दुचाकीवर बसविले.
हेही वाचा… पातूरचे गणेशोत्सव मंडळ राज्यात ठरले अव्वल; आकर्षक पर्यावरणपूरक सजावट
त्या नराधमाने तिला बेलखेड परिसरात नेले. तेथे एका शेतात नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तिच्या छातीवर मारहाण केली. घटनेनंतर तिला उमरखेड येथील एका मंदिर परिसरात आणून सोडले. तेव्हा चिमुरडी रडत होती. ती कशीबशी शाळेत पोहोचली. मात्र, काही तरी विपरीत घडले, याची शिक्षकांना कल्पना आली. त्यांनी त्वरित तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नंतर लगेचच पोफाळी पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ यंत्रणा कामाला लावली. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. आरोपीचा कसून शोध सुरू आहे. मुलीला तपासणी व उपचाराकरिता यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पोफाळीचे ठाणेदार दीपक ढोमणे पाटील यांनी मुलीच्या बयाणावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील स्थळ, रस्त्यांची तपासणी करण्यात आली.